Showing posts with label AmolShinde बरं नाही खरं. Show all posts
Showing posts with label AmolShinde बरं नाही खरं. Show all posts

Tuesday, 23 January 2018

जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी नाही तर राज्य सरकारी कर्मचाऱ्या चा हक्क आहे

*जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी नाही तर राज्य सरकारी कर्मचाऱ्या चा हक्क आहे*

सध्या एक पत्र सोशल मीडिया वर फिरत असून आर्थिक बोजा शासनावर पडत असल्याने जुनी पेन्शन देता येणार नसल्याचे या पत्रात सांगितले आहे.पण आशा पत्राने जुनी पेन्शन लढा थांबणार नाही तर तो अधिक तीव्र होईल.लोकशाहीत लोकमताने सरकार बदलू शकते तसे सरकारचे मतही.पण आपण मागत असलेली मागणी योग्य आहे का?असेल तर ती कशी?या लढ्यात गेली 4 वर्षे सक्रिय असून अजूनही लढणाऱ्याना व शासनात बसलेल्याना नेमके आम्ही जुनी पेन्शन का मागतोय हे समजले नाही असे वाटत असल्याने मी का जुनी पेन्शन मागतोय ते लिहत आहे.तुम्हाला काय वाटते याबाबत हे जाणायला आवडेल.जुनी पेन्शन आपला हक्क कसा हे समजून घेण्यासाठी खालील लेख पूर्ण वाचा अन coment box मध्ये आपली मते मांडा.

*एकच मिशन जुनी पेन्शन ची टोपी काय मागत आहे?*

गेल्या दोन तीन वर्षांत राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी आक्रमक पणे करत आहेत.यासाठी विविध स्तरावर आंदोलने सुरू आहेत.जुनी पेन्शन योजना म्हणजे 1982 ची नागरी पेन्शन योजना.ही जुनी योजना केंद्र शासनाने बंद करत 1 जानेवारी 2004 पासून सेवेत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)अंमलात आणली.केंद्राचे अनुकरण करत राज्यांनी पुढे तशीच योजना राज्यसरकारी कर्मचाऱ्याना लागू करण्याचे निर्णय घेतले.महाराष्ट्रात तत्कालीन सरकारने 1 नोव्हेंबर 2005 हा मुहूर्त राज्यात जुनी पेन्शन रद्द करून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अमलबजावणी साठी शोधला.अन 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या राज्यसरकारी कर्मचाऱ्याना नवीन योजना लागू झाली.नवीन पेन्शन योजना आणताना पेन्शन योजनेचे ध्येय याबाबत सर्वोच्च न्यायालयाने डी. एस.नकारा विरुद्ध भारत सरकार या प्रकरणी दिलेल्या निवाड्यात दिलेले खालील अभिप्राय पहाणे महत्वाचे.
 1.कर्मचाऱ्याना दिले जाणारे निवृत्ती वेतन बक्षीस किंवा दानशूरता म्हणून मालक देत नाही.उलटपक्षी निवृत्तिवेतन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे.
2.निवृत्तीवेतन हे अनुग्रहपूर्वक दिलेलीे रक्कम  नसून केलेल्या सेवेबद्दलचे प्रदान आहे.
3.सामाजिक सुरक्षितता म्हणून कर्मचाऱ्याने वृद्धावस्थेत सन्मानाने व योग्यरित्या आयुष्य व्यथित करावे या उद्देशाने निवृत्ती वेतन दिले जाते.
सर्वोच्च न्यायालयाने वर रेखाटलेली भूमिका पाहिल्यास नवीन आणलेली अंशदान निवृत्ती वेतन योजना वरील ध्येय गाठण्यात ती 12 वर्षांनी यशस्वी होताना दिसत आहे काय?व जर नसेल तर त्याबाबत तात्काळ निर्णय घेत वरील ध्येय साध्य करणारी योजना लागू करणे सरकारचे कर्तव्य आहे.

मुळात जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यास त्याच्या निवृत्तीच्या वेळच्या पगाराच्या शेवटच्या 10 महिन्यांच्या पगाराच्या सरासरीच्या 50 टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळत व त्यामध्ये वाढणाऱ्या महागाई नुसार वाढ होत जात. तसेच कर्मचाऱ्याचा मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन मिळत.कर्मचाऱ्यास मिळणारे निवृत्ती वेतन निश्चित होते त्यात अनिश्चितता नव्हती.तसेच हे निवृत्ती वेतन देण्यासाठी त्याच्या सेवाकालातील पगारातून कोणत्याही प्रकारची रक्कम कपात पेन्शनसाठी केली जात नसत.

पण 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत येणाऱ्या राज्यसरकारी कर्मचाऱ्यांसाठी अस्तित्वात आलेल्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेत निवृत्तीनंतर मिळणारे निवृत्ती वेतन अनिश्चित आहे.ही योजना मार्केट मधील गुंतवणुकीवर आधारित आहे.मार्केटच्या चढउताराचा निवृत्ती वेतनावर परिणाम होणार आहे.तसेच या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्याच्या अकस्मिक मृत्यूनंतर द्यायच्या लाभाबद्दल स्पष्टता नाही.त्यामुळे आज राज्यात कर्मचाऱ्याच्या अकाली अकस्मिक मृत्यूनंतर त्या कर्मचाऱ्यांस कसलाच लाभ दिला नसल्याचे व सदर कुटुंबे खूपच आर्थिक अडचणीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

*नवीन योजनेचे स्वरूप कशी व किती मिळणार पेन्शन*
या नवीन पेन्शन योजनेनुसार निवृत्ती वेतन देण्यासाठी कर्मचाऱ्याच्या सेवाकालातील पगारातून दरमहा 10 टक्के रक्कम कपात जाते.तितकाच सममूल्य शासनहिस्सा दिला जाईल व ती रक्कम शासनाने नियुक्त केलेल्या फंड मॅनेजर कंपन्या बाजारात गुंतवतील व सदर गुंतवणुकीतून सेवानिवृत्ती वेळी जमा होणाऱ्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांस दिली जाईल व 40 टक्के रक्कम सरकार जमा ठेवून त्यावर मिळणारे व्याज व गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभावर आधारित निवृत्ती वेतन दिले जाईल असे ढोबळ स्वरूप या नवीन योजनेचे आहे.निवृत्ती वेळी एक पेन्शन ठरल्यानंतर त्यात महागाईनुसार वाढ होणार नाही.

ही योजना महाराष्ट्र सरकारने 1 नोव्हेंबर 2005 पासून लागू केली आहे.पण आज अखेर राज्यातील शिक्षकांना गेल्या 12 वर्षात एकदाही सममूल्य शासन हिस्सा व व्याज दिले नाही व कर्मचाऱ्यांच्या पगारातून केलेली रक्कम ही मार्केट मध्ये गुंतवली नाही.केंद्राच्या धरतीवर योजना अंमलात आणली पण तिच्या अमलबजावणीकडे लक्ष देण्यात आले नाही.त्यामुळे  1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या कर्मचाऱ्याचे भविष्य असुरक्षित झाले आहे.12 वर्षे याबाबत ठोस धोरण नसल्याने राज्य सरकारी कर्मचारी हवालदिल होऊन जुनी पेन्शनच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे.

*राज्याने फक्त आदेश काढले अमलबजावनीकडे दुर्लक्ष*
1 जानेवारी 2004 ते 1 नोव्हेंबर 2005 म्हणजे केंद्र शासनानंतर 1 वर्षे 10 महिन्यानी ही योजना महाराष्ट्र सरकारने स्वीकारली.आजही अनेकजण ही योजना बदलणे केंद्र सरकारच्या अधिकारातील विषय आहे असे सांगतात,पण वरील बाबी वरून राज्यसरकारला ही योजना नाकारण्याचा व जुनी पेन्शन चालू ठेवण्याचा अधिकार आहे हे स्पष्ट होते.केंद्रानंतर जवळपास पाऊणे दोन वर्षांनी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला.हा काळ या नवीन योजनेचा अभ्यास व अमलबजावणी प्रक्रिया याचा अभ्यास यासाठी लागला असावा. त्यानंतर राज्याने ही योजना तयारीनिशी स्वीकारली असावी असे वाटते.पण आज 12 वर्षानंतर या योजनेच्या अमलबजावणी मधील गोंधळ पहाता राज्यशासनाने विना अभ्यास व तयारी न करता केंद्राची कॉपी केली पण जेव्हा प्रत्यक्ष अमलबजावणीची वेळ आली तेंव्हा मात्र नापास व्हावे लागले असेच दिसत आहे.त्यासाठी गेल्या 12 वर्षातील काही महत्वाचे शासन आदेश पाहिल्यास स्पष्टता येईल.

31 ऑक्टोबरला 1 अध्यादेश काढत 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्याना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली.पण या योजनेची अमलबजावणी व कार्यपद्धती बाबतचा सविस्तर शासन आदेश 21 मे 2010 ला काढण्यात आला.म्हणजे योजना लागू 2005 ला केली व तिची कार्यपद्धती 2010 ला पाच वर्षांनंतर?खरेतर नवीन योजना मार्केट आधारित असल्याने पहिल्या महिन्यापासून तिची अमलबजावणी होणे आवश्यक होते.शासन अध्यादेश आल्यानन्तर लगेचच कार्यपद्धती निश्चित करून अमलबजावणी होणे गरजेचे पण कार्यपद्धतीचा आदेश काढायला पाच वर्षे लागली.

दरम्यानच्या काळात अनेक शासन आदेश येत पण शिक्षक कर्मचारी वगळून हे आदेश यायचे.अखेर 29 नोव्हेंबर 2010 ला शिक्षकांच्या बाबतीत या योजनेची कार्यपद्धती सांगणारा शासन आदेश आला.पाच वर्षांनंतर आदेश आल्यानन्तर तरी अमलबजावणी होणे गरजेचे होते पण या आदेशानंतर फक्त पगारातून कपाती सुरू करण्याची अमलबजावणी करण्यात आली व शासन आदेशात सांगितलेल्या इतर कोणत्याच बाबीची अमलबजावणी झाली नाही.शिक्षकांच्या कपाती झाल्या पण सदर कपात केलेली रक्कम जमा करण्यासाठी लेखाशीर्ष देण्यासाठी पुढे पाच वर्षे गेली.आज ही राज्यात अंशदान पेन्शन अंतर्गत किती शिक्षक येतात?त्यांची आजपर्यंत किती रक्कम कपात करण्यात आली याची अचूक आकडेवारी उपलब्ध नाही.नुकतेच 13 नोव्हेंबर 2017 ला शिक्षण उपसंचालक,शिक्षण संचलनालय पुणे यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्याना पत्र काढून याबाबत माहिती सादर करण्यास सांगितले आहे.योजना आणून 12 वर्षे झाली तरी फक्त टोलवा टोलवी सुरू आहे.शिक्षकांना त्यांच्या कपातीचा हिशेब सुद्धा देण्यात आला नाही तर अनेकांची DCPS खाती न काढता कपाती करण्यात आल्या.

सुरवातीच्या 10 वर्षात फक्त कपात सोडून काहीच अमलबजावणी झाली नाही.फ़ंड मॅनेजर नाही,शासन हिस्सा नाही,व्याज नाही अन कापलेली रक्कम ज्या कारणासाठी घेतली त्यासाठी गुंतवणूक नाही.दरम्यानच्या काळात काही शिक्षक मृत झाले तर त्यांना नेमका परतावा काय द्यावा व त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना देण्याबाबत आजही निर्णय नाही.राज्याने केंद्राने या योजनेच्या अमलबजावणीसाठी केलेली तयारी मात्र केली नाही.आज या नव्या योजनेमध्ये आवश्यक बदल करत केंद्राने आकस्मिक,अकाली मृत होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन या योजनेत दिले.तसेच सर्व कर्मचाऱ्याना सेवा उपदान( ग्रॅज्युटी ) देण्याचा निर्णय घेतला पण याबाबीकडे महाराष्ट्र सरकारने सोयीस्कर दुर्लक्ष केले. अन शेवटी डिसीपीएस योजना राबवणे जमत नाही हे लक्षात आल्यावर 27 ऑगस्ट 2014 ला शासन आदेश काढून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना(DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय पेन्शन योजना(NPS) मध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला.यावरून महाराष्ट्र शासन या  नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या(DCPS)अमलबजावणीत अपयशी झाल्याचे नव्याने सेवेत आलेल्या कर्मचाऱ्याच्या लक्षात येऊ लागले अन 2014 पासूनच जुनी पेन्शन लागू करा या मागणीस बळ येऊ लागले,अन तोपर्यंत या योजनेत येणाऱ्या कर्मचाऱ्याची संख्या ही एकूण कर्मचारी संख्येच्या 33 टक्के झाली होती अन ते संघटित होऊ लागले.अन तेथूनच कर्मचारी संघटनेच्या मागणी मध्ये जुनी पेन्शन लागू करा ही मागणी दिसू लागली.

*DCPS योजना NPS मध्ये विलीन झाल्यावर काय होणार?*
NPS मध्ये जाण्यास ही कर्मचारी विरोध करत आहेत.याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या 12 वर्षात राज्यसरकारी कर्मचाऱ्याची या योजनेसाठी कपात करण्यात आलेली 1 रुपया ही रक्कम बाजारात गुंतवली गेली नाही.ज्यादिवशी कर्मचारी NPS मध्ये जाईल तेंव्हा पासून NPS द्वारा ती गुंतवली जाईल अन तेथून पुढे NPS नुसार लाभ मिळतील.पण गेल्या 12 वर्षात गुंतवणुक शासकीय धोरणाच्या अमलबजावणी अभावी राहिली पण तिचा फटका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी का सहन करावा?एकाच दिवशी समान पदावर,समान वेतनश्रेणीत सेवेत एक कर्मचारी केंद्र सरकारच्या सेवेत तर दुसरा राज्य सरकारच्या सेवेत आले.दोघेही एकाच दिवशी समान पदावर,समान वेतनश्रेणीत,एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले तर दोघनाही निवृत्त होताना NPS मधून मिळणारी पेन्शन मात्र समान मिळणार नाही.कारण राज्यसरकारी कर्मचारी NPS मध्ये 2017 मध्ये सामील झाला तर केंद्र सरकारी कर्मचारी मात्र सुरवातीपासूनच NPS मध्ये असल्याने त्याची गुंतवणूक वेळेत झाल्याने लाभ अधिक मिळणार.शासनाच्या 12 वर्षे केलेल्या चालढकलीचा फटका मात्र राज्यसरकारी कर्मचाऱ्यास बसनार असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची नागरी पेन्शन देणे हाच पर्याय असून आज पर्यंतच्या केलेल्या सर्व रकमा GPF खात्यावर वर्ग करून या कर्मचाऱ्याचे भविष्य सुरक्षित करावे अशी मागणी पुढे येत आहे.शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत वेळीच सोडवणूक करणे गरजेचे आहे.अन्यथा भविष्यात खूप मोठ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या असंतोषास सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.संपूर्ण देशभर याबाबत असंतोष असून केंद्रीय कर्मचारी ही या योजनेपासून समाधानी नाहीत.

अमोल शिंदे 
जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
मोबाईल-9420453475

Tuesday, 16 January 2018

स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजारोहन कोणी करावे यावरून काहि ठिकाणी प्रश्न निर्माण व्हावेत?

*स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजारोहन कोणी करावे यावरून काहि ठिकाणी प्रश्न निर्माण व्हावेत??*

स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण म्हणजे आंनदाचे दिवस. एकता, समानता,स्वातंत्र्य,बंधुता,मानवता मनामनात रुजवणारे दिवस.पारतंत्र्यातील काळी राजवट अन त्याविरुद्ध  आवाज उठवत स्वातंत्र्यसूर्य उगवण्याकरीता बलिदान देणारे राष्ट्रीय नेते,क्रांतीकारक यांच्या कार्याचे स्मरण करत.उज्वल भारतासाठी आपला खारीचा वाटा उचलण्यास प्रेरित करत,मनामनात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करणारे सण.ते निखळ आंनदाने एकात्म भावाने आपण साजरे करतो.

नुकताच संघटनेच्या वतीने सीईओ साहेबाना भेटायला जाणार होतो अन एका शिक्षक मित्राचा फोन आला अन त्याने विचारलेल्या प्रश्नाने अंतर्मुख व्हायला लावले.तो प्रश्न होता.स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी शाळेमधील ध्वजारोहन कोणी करावे??स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजारोहन कोणी करावे हा प्रश्न निर्माण व्हावा??त्याला काय असत गावातल्या स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक,प्रतिष्ठित नागरिक,पदाधिकारी यांच्यापैकी कोणाच्या तरी हस्ते करायचं असे सांगितल्यावर ते मित्र म्हणाले नाही सर गावात निवडणुका झाल्या आहेत अन नियमाने ध्वजारोहण  कोण करायचे ते सांगा??मी निरुत्तर झालो.कारण असा काही नियम आज पर्यंत आम्ही लावला नव्हता व तसा विचार ही केला नव्हता.सिईओ साहेबाना नेमकी मुख्याध्यापकाची अडचण सांगितली व शासनाकडून त्याबाबत मार्गदर्शन मागवण्याची विंनती केली.भविष्यात ते येईल ही पण देशप्रेमापेक्षा राजकीय अभिनिवेश महत्वाचे ठरुन निर्माण होणारे असे प्रश्न नकीच अंतर्मुख करायला लावणारे आहेत.भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत असे रोज प्रतिज्ञेत जोर जोराने म्हणून ही तिची रुजवणूक मात्र झाली काय?अन झाली तर हा प्रश्न निर्माण झाला नसता..

खरेतर असा प्रश्न निर्माण व्हायला नाही पाहिजे पण बदलत्या काळात निर्माण झालेला असा हा प्रश्न.बहुसंख्य ठिकाणी हा प्रश्न निर्माण होत नाही.गावातील स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक,प्रतिष्ठित नागरिक,पदाधिकारी यांच्यापैकी कोणाच्या तरी हस्ते ध्वजारोहण केले जाते.पण काही ठिकाणी मात्र ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करावे यासाठी चढाओढ होते अन कार्यक्रमाचा मूळ उद्देश बाजूला जात सदर शाळेतील शिक्षकांची ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करायचे या प्रश्नाचे उत्तर देताना गोंधळाची स्थिती होत निष्कारण मानसिक त्रासास व रुसव्या फुगव्याना सामोरे जावे लागत असल्याचे प्रकार काही ठिकाणी होतात.हे वास्तव आहे.खरेतर याबाबत स्पष्ट असे आदेश नाहीत.पण एकंदर बदलत असलेली परिस्थिती,समाजमनाचा विचार करत शाळेतील ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करावे याबाबत काही मार्गदर्शक सूचना निर्गमित होणे शाळेतील मुख्याध्यापकांच्या दृष्टीने गरजेचे आहे.पण हा प्रश्न निर्माण होऊ नये अन लोकशाहीतील या पवित्र सणाच्या दिवशी आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी आपण सर्वजण भारतीय या एका सूत्रात बांधले गेलो पाहिजे.भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत असे प्रार्थनेत म्हणतो.मग राष्ट्रध्वज फडकवणारा भारतीय आहे,तो माझा बांधव आहे एवढी बाब मनात रुजवली तर ध्वजारोहण कोणी करावे??हा प्रश्न निर्माण होणार नाही.अनेक क्रांतिकारकानी रक्ताचे पाट वाहिले,आजही सीमेवर लाखो जवान आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी सीमेवर लढत आहेत.खडा पहारा देत आहेत.या सर्वांना वंदन करताना आपण आपली ओळख विसरून भारतीय म्हणूनच या राष्ट्रीय सणात सामील झालो तर आनन्द द्विगुणित होईलच पण ऐक्याची भावना वृद्धिंगत होत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण निखळ आंनदाने एकात्म भावाने साजरे होतील...

अमोल शिंदे


Tuesday, 9 January 2018

शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या गाड्यामध्ये इलेक्ट्रॉनिक काटे कधी येणार??

शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या गाड्यामध्ये इलेक्ट्रॉनिक काटे कधी येणार???

बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर शालेय पोषण आहार तांदूळ व धान्यादी माल वाटप सुरू झाले.शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या गाड्यामध्ये इलेक्ट्रॉनिक काटे असावेत अशी मागणी वेळोवेळी केली.नुकत्याच झालेल्या शिक्षण समिती सभेमध्येही हा विषय मांडला.सर्व सदस्यांनीही इलेक्ट्रॉनिक काटे पुरवठादाराने गाडीत ठेवले पाहिजेत व त्यास सूचना करू असे सांगितले.त्यामुळे यावेळी शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या गाड्यामध्ये इलेक्ट्रॉनिक काटा असेल असे वाटले होते.पण यावेळीही जुन्या ताणकाटा पद्धतीनेच वाटप होत आहे.लवकरच या ताणकाट्याच्या जागी इलेक्ट्रॉनिक काटे येतील अशी आशा आहे. त्यामुळे तांदळाची 50 किलो ची पोती वजन करून घेणे सोपे होईल....

सोबत याबाबत सध्या वजनाच्या पद्धतीचे काही फोटो.

Monday, 1 January 2018

31 डिसेंबर मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्यासोबत

यंदाचा 31 डिसेंबर स्पेशल झाला.तसे 31 डिसेंबर कधी आम्ही साजरा करत नाही.पूर्वी घरी एकच दूरदर्शन चैनल असायचे अन 31 डिसेंबर दिवशी काही विशेष कार्यक्रम असायचे.आम्ही आवर्जून घरातील सर्वजण एकत्र तो कार्यक्रम पहायचो.तोच आमचा 31 डिसेंबर पण पुढे चैनलच्या गर्दीत तो हरवला.अन सोशल मीडियावर सर्वाना शुभेच्छा संदेश पाठवण्यापर्यंत येऊन तो येऊन थांबला...

पण कालचा 31 डिसेंबर मात्र खऱ्या अर्थाने साजरा झाला तो बदलत्या जीवनशैलीत, हरवलेल्या कुटुंब व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या समस्या,अन त्यातून पुढे जाण्यासाठी स्वतःपासून नव्या वर्षात कशी सुरवात करावी याबद्दल मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाने.मराठा सेवासंघाच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात 2017 ला निरोप व नव्यावर्षाचे स्वागत करताना आदरणीय खेडेकर साहेबांनी छोटी झालेली कुटुंबे,अतिसुरक्षित रहाण्याच्या सवयीने स्वतःच्या क्षमतांचा विसर पडत असलेले पालक व बालक,सुजाण पालकत्व म्हणजे नेमके काय?स्वतःच्या शरीराकडे होणारे दुर्लक्ष अन त्यासाठी नियमित व्यायामाचा संकल्प पूर्णत्वास नेण्याची गरज अत्यन्त सहजपणे उदाहरणांसह साहेबानी सांगितली.

समाजाचे छोटे रूप कुटुंब,अन या कुटुंबात मातेचे स्थान अनन्यसाधारण महत्वाचे.पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेचा त्याग करत,स्त्री पुरुष समतेवर आधारित व्यवस्था स्वतःच्या घरापासून सुरू करण्याचे आवाहन साहेबानी केले.महिलांना बरोबरीचे स्थान हे खऱ्या अर्थाने समाज सक्षम करण्याचे पहिले पाऊल आहे.यावेळी एकतर्फी भाषण न करता उपस्थितांशी अत्यन्त खुला संवाद साहेबानी साधत उपस्थितांना बोलते केले.फक्त मुले इंग्रजी माध्यमात शाळेला घातली म्हणजे जबाबदारी संपली नाही.आईला आगोदर उत्तम इंग्रजी आले पाहिजे.प्रत्येक आईला संगणक हाताळता आला पाहिजे.सध्याच्या काळात आई अपडेट हवी अन त्यासाठी आईने(स्त्रियांनी)स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे.स्वतःची दिनचर्या निश्चित करावी.येणाऱ्या काळात नोकऱ्याच्या मागे धावण्यापेक्षा  कोणताही व्यवसाय करण्याची तयारी युवकांनी ठेवावी,तसेच पालकांनी आपल्या मुलांना व्यवसाय,उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करावे.विवाह करताना बऱ्याच वेळा मुलग्यापेक्षा मुलगी कमी शिकलेली असावी असा कल असतो तो बदलून मुलग्यापेक्षा मुलगी अधिक शिकलेली असावी असा दृष्टिकोनात बदल केला पाहिजे.फक्त इंजिनियर व डॉक्टरच होण्यापेक्षा स्वतःच्या उपजत कलागुणांना/क्षमताना वाव देत मनोरंजन विश्वात व माध्यमामध्ये करिअर करण्याकडे तरुण तरुणींनी लक्ष द्यावे असा संदेश आदरणीय खेडेकर साहेबानी दिला.

खऱ्या अर्थाने सरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे स्वागत एका असामान्य व्यक्तिमत्वासोबत त्यांचे विचार ऐकत झाल्याने आजचा 31 डिसेंबर स्पेशल बनला...

🎉🎊आपणांस व आपल्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक  शुभेच्छा 🎉🎊🌷🌸🌺🌹

          🎉🎉  *नवीन वर्ष 2018 हे आपणांस आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…🎉🎉🌹🌹☘☘🌺🌺

अमोल शिंदे

Tuesday, 26 December 2017

शिक्षक आम्हाला शिकवू द्या असे म्हणत असताना संघटनांची अधिवेशने उन्हाळी सुट्टीतच घेणे नैतिक कर्तव्य

🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅
*शिक्षक आम्हाला शिकवू द्या असे म्हणत असताना संघटनांची अधिवेशने उन्हाळी सुट्टीतच घेणे नैतिक कर्तव्य*

*शिक्षकानी विशेष रजा मिळाली तरच संघटनची वर्गणी देणार ही मानसिकता सोडत संघटनांना शैक्षणिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी तयार व्हावे*
🙅🤷‍♂🙅‍♂🤷‍♀🙅🤷‍♂🙅‍♂🙅🤷‍♂

*शिक्षक संघटना, शिक्षक, पालक,समाज वेगळे आहेत असे न होता शिक्षक,शाळा, संघटना यांच्यात एकात्मभाव निर्माण व्हावा हाच खालील पोस्ट लिहण्याचा हेतू....*

✒ *अमोल शिंदे*✒
*प्राथमिक शिक्षक*
9420453475
👇👇👇👇👇👇👇👇

एकीकडे शिक्षक व शाळा विविध समस्यांनी व्यथित असताना त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यापेक्षा या अडचणींचा फायदा घेण्यासाठी काही मंडळी सरसावली आहेत.गेल्या काही वर्षांत शिक्षक संघटनांच्या नेत्यांतील आपसी मतभेद व उच्च पराकोटीचा अहंकार यामुळे कोणतेही कारण नसताना शिक्षक व शाळा यांची फरफट होत आहे.प्राथमिक शिक्षकांच्या संघटना नेहमीच मजबूत होत्या.राज्यातील तमाम शिक्षकांनी या संघटनांना नेहमीच भरभरून प्रेम व आर्थिक पाठबळ दिले.यातूनच काही शिक्षक नेत्यांना आमदार होता आले.ही ताकत शिक्षकांची आहे.शिक्षक संघटनांची स्वतःची स्थावर मालमत्ता,सभागृहे,विद्यालये, शिक्षक भवने अस्तित्वात आली.ही बाब शिक्षक व संघटनांच्या दृष्टीने अभिमानाची पण काळाच्या ओघात या संघटना अन त्यांची मालमत्ता प्रायव्हेट लिमिटेड आपल्या खाजगी मालकीच्या असाव्यात अशी भावना शिक्षक नेत्यांच्या झाल्या.अन त्यातूनच विघटनास सुरवात झाली. *1970 ते 2000या कालखंडात संघटनांनी खुपच नेत्रदीपक कार्य केले.शिक्षकांना मान,सन्मान मिळवून दिला.पण 2000  नंतर शिक्षण सेवक,2005 मध्ये अंशदान पेन्शन योजना व 23 ऑक्टोबर 2017 ला आलेला वरिष्ठ वेतन श्रेणी बाबत आदेश गेल्या 17 वर्षात शिक्षक संघटनांच्या घसरलेल्या प्रभावाचे द्योतक आहेत.*

काळाच्या ओघात नेतृत्वात होणारा बदल न करता संघटनेचे नेतेपद हे सत्ता स्थान असून त्यावर आपलेच नियंत्रण हवे यासाठी सुरू झालेल्या संघर्षात शिक्षक,शाळा, त्यांच्या समस्या मागे पडल्या.प्रबळ संघटना व आर्थिक गणित यामुळे नेत्यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या.राज्याच्या नेत्यांना आमदार,जिल्ह्याच्या नेत्याला शिक्षक बँकेचा चेअरमन, तालुक्याच्या नेत्याला शिक्षक पतसंसंस्थेचा चेअरमन होणे व त्यातून स्वतःची आर्थिक प्रगती साधने हे ध्येय बनले.आंदोलन व चळवळ यापासून दूर जात आपापसात वळवळ करण्यातच सगळे रममाण दिसतात.मग पुढे राज्यात शिक्षक संघटना राजकीय पक्षांच्या दावणीला बांधल्या गेल्या अन खऱ्या अर्थाने संघटना अस्तित्वहीन होत चालल्या.

शिक्षक संघटनांची अधिवेशने अत्यन्त भरगच्च व निर्णायक होत.अनेक शिक्षक हिताचे निर्णय संघटनांच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून होत.अन त्यामुळे संघटनांच्या अधिवेशनाना मोठा प्रतिसाद शिक्षक देत.या अधिवेशनात शिक्षक नेते, प्रशासकीय अधिकारी,पदाधिकारी,मंत्री एकत्र येत व शिक्षण विषयक उहापोह व्हायचा व एक सर्वसमावेशक कार्यक्रम घेऊन पुढे जात.नक्कीच अशी अधिवेशने व्हावीत असे शिक्षकांना वाटायचे.पण गेल्या काही वर्षांत ही संघटनांची अधिवेशने विवादाचा विषय बनली आहेत.संघटनांच्या अधिवेशनासाठी शिक्षकांना ऑन ड्युटी विशेष रजा शासन मंजूर करत.अधिवेशनासाठी संघटना वर्गणी गोळा करत,जो पावती घेईल त्याला तो अधिवेशनास न जाता अधिवेशनात उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र दिले जायचे.जाणाऱ्याला ही मिळते न जाणाऱ्याला ही उपस्थिती प्रमाणपत्र मिळते मग प्रवास खर्च करून कशाला अधिवेशनाला जायचे घेऊ निवांत विश्रांती अशी भावना वाढीस लागली.शिक्षकांची राज्यभरातील संख्या व या पावत्या मधून गोळा होणारा पैसा हेच संघटनांच्या विघटनाचे प्रमुख कारण बनले.अधिवेशन पावत्यासाठी झाली,शिक्षकांची अधिवेशन स्थळी उपस्थिती घटली, अधिवेशनातील रिकाम्या खुर्च्या व दुसरीकडे शिक्षकाविना रिकाम्या शाळा असे चित्र अधिवेशन काळात निर्माण होऊ लागले अन त्यामुळेच या अधिवेशनाबाबत प्रश्न माध्यमे विचारू लागली.

बहुसंख्य शिक्षक रजा मिळते म्हणून पावती घेत व अधिवेशनास मात्र जात नाहीत,काहीजण सहलीला जातात तर बरेच घरी राहतात अन काही पावती घेऊन ही शाळेस जातात.शेवटी शिक्षकी पेशा व सामाजिक बांधिलकी एकाच नाण्याच्या दोन बाजू.जर अधिवेशन रजा घेतली आपण शाळेत गेलो नाही तर अधिवेशनास उपस्थित रहाणे हे नैतिक कर्तव्य पण संघटना अधिवेशनाची जाहिरात करताना अधिवेशनाचा उद्देश,तेथे कोणत्या विषयावर चर्चा होणार,शिक्षक सक्षमीकरणासाठी कोणता कार्यक्रम हाती घेणार याचा प्रचार व प्रसार न करता आपणाला किती दिवस रजा मिळणार व कोठे फिरता येणार याची जाहिरात करतात यातूनच या अधिवेषणांचा घसरलेला स्तर व भरकटलेली दिशा स्पष्ट होते.

असे एक चित्र असले तरी यातून काही हाताच्या बोटावर मोजता येईल इतके नेते लाभार्थी झाले त्यांचे वैभव व डामडौल पाहून प्रत्येकाला शिक्षक संघटनातील नेत्यांना अधिवेशन व इतर बाबीतून खूप आर्थिक लाभ होतो असा समज निर्माण झाला.पण वास्तव वेगळेच असून आजही हजारो शिक्षक नेते तन, मन,धनाने शाळा व शिक्षक हितासाठी झटत आहेत.अन हे कार्य करताना त्यांना आर्थिक पाठबळ असणे गरजेचे आहे.यासाठी शिक्षकांनी विशेष रजा मिळाली तरच संघटनेची वर्गणी देणार ही मानसिकता सोडणे गरजेच आहे.आपले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपण संघटित असणं गरजेचेच आहे.अन आजच्या काळात संघटन निर्माण करणे व ते चालवणे यासाठी आर्थिक बाब लागतेच अन त्या संघटनेच्या किमान खर्चाची तरतूद सभासदांनी दिलेल्या वर्गणीतून व्हायला कोणाचा आक्षेप नसावा.पण एक काळ विशेष रजेसाठी पावती हा निर्माण झालेला पायंडा बदलून संघटन खर्चासाठी वर्गणी देण्यास शिक्षकांनी पुढे आल्यास शिक्षक नेतेही नक्कीच सुट्टीत अधिवेशन घेण्यास तयार होतील. *संघटनात्मक कामासाठी वर्गणी देऊ पण शाळेला सुट्टी नको ही भूमिका सर्व शिक्षकांनी घ्यायला हवी.*

सध्या शिक्षक व शाळा यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत.राज्यातील 1314 शाळा बंद करण्याचा निर्णय होत झाला तर दुसरीकडे खाजगी कंपनीना शाळा उघडण्यास मान्यता देत शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना त्याविरुद्ध *हिवाळी अधिवेशनात रस्त्यावर उतरून यलगार न पुकारता अधिवेशनाला विशेष रजा मंजुरीसाठी संघटनांचे नेते मंत्र्याचे उंबरठे झिजवत आहेत हे नक्कीच भूषणावह नाही.*शिक्षक स्वाभिमानी आहेत अन ते गोर गरिबांच्या शाळा टिकाव्यात व बहुजनांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देता यावे यासाठी आम्हाला शिकवू द्या अशी आर्त हाक देत असताना संघटनांनी मात्र उन्हाळी सुट्टीत अधिवेशन न घेता शाळेच्या वेळातच अधिवेशन घेण्यासाठी चालवलेली धडपड शिक्षक एका दिशेला तर शिक्षक संघटनांचे नेते दुसऱ्या दिशेला असल्याचे स्पष्ट करते.

भारतीय संस्कृतीत शिक्षकाचे स्थान मातापित्यानंतर पण परमेश्वराच्या अगोदर आहे.शिक्षकांनी अत्यन्त सचोटीने कार्य करत समाजात स्वतःचे स्थान अबाधित ठेवले असून त्यास धक्का लागणार नाही याची दक्षता घेणे ही शिक्षक संघटना व शिक्षक नेत्यांची जबाबदारी नव्हे कर्तव्यच आहे. *संघटनांच्या नेत्यांनी शिक्षक व समाजमन याचा आदर करत फुटकळ विशेष रजेसारख्या गोष्टीसाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत.त्यापेक्षा 1314 शाळा बंद करण्याचा निर्णय,खाजगी कंपनीना शाळा काढण्यास परवानगी देणारे विधेयक, 23 ऑक्टोबर 2017 चा वरिष्ठ वेतन श्रेणी बाबतचा निर्णय,राज्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे,रखडलेल्या पदोन्नत्या,केंद्रप्रमुख व शिक्षण विभागातील रिक्त पदांची भरती,ऑनलाईन कामासाठी व्यवस्था व डाटा ऑपरेटर,सर्व विषय शिक्षकांना समान वेतनश्रेणी,अंशदान पेन्शन योजनेचा निर्णय रद्द करणे,BLO सारख्या अशैक्षणिक कामातून कायमची सुटका यासाठी  पणाला लावली तर समस्त शिक्षक स्वागत करतील.* पण सध्याचे नेते अधिवेशनासाठी एकत्र येतात व हिशेबासाठी दूर जातात हे अलीकडील युवा व बुद्धिवादी शिक्षक बंधू भगिनींच्या लक्षात आले आहे.या लोकांच्याकडे लक्ष न देता ते शाळा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत.संघटनांचे महत्व खूप आहे.पण काही स्वार्थी नेत्यांनी या संघटना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरण्याचा चंग बांधला आहे.सेवानिवृत्त शिक्षकांनी संघटनांचा व शिक्षक हिताचा सर्व भार उरावर न घेता सेवानिवृत्त लोकांच्या समस्यां सोडवण्यासाठी वेळ द्यावा व सेवेत असलेल्यानी व स्वतःला शिक्षक समजणाऱ्या व त्याचा अभिमान असणाऱ्या मंडळींनी या संघटनांचे शैक्षणिक व प्रशासनिक नेतृत्व करावे व शिक्षकांनी ही इतिहासात शिक्षक नेत्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचे दाखले देत वर्तमानातील त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करत अंद्ध समर्थन करणे बंद करावे.बदलता समाज,बदलते शिक्षण यात शिक्षक संघटनांनी काळानुरूप बदल करत स्वतःच्या भूमिकांत सकारात्मक बदल करावा.याची सुरवात अधिवेशन सुट्टीत स्वतःहून घेऊन करावीत,यामध्ये पालक उद्बोधन यासाठीही नियोजन करावे,अधिवेशनात शैक्षणिक बाबीना अधिक महत्व द्यावे व प्रशासकीय अडचणीसाठी रस्त्यावर उतरण्याचे धाडस दाखवावे तरच येणाऱ्या काळात शिक्षक संघटना व त्यांच्या अधिवेशनाना गर्दी होईलच पण दर्दी लोकांचे पाठबळ ही मिळेल....
(जो व्यक्ति अपने निर्णयों को बार-बार बदलता है , उसकी निष्पक्षता और बुद्धिमत्ता संदिग्ध रहती है ! इसीलिए नेतृत्व कर्ता को ठीक से सोच विचार कर दूरदर्शिता के साथ सही  निर्णय लेना आना चाहिए )

वरील बाबी कोणत्याही संघटना अथवा शिक्षकांना विरोध अथवा आकस यातून लिहल्या नाहीत,शिक्षक संघटनांचे योगदान महत्वाचे असून येणाऱ्या काळात संघटना अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.त्यासाठी कालानुरूप काही बदल व्हावेत असे मनापासून वाटत आहे म्हणून लिहले आहे.फक्त *शिक्षक नेत्यांवर जबाबदारी न ढकलता शिक्षकांनीच या बदलाची सुरवात स्वतः पासून करताना संघटनांच्या आवाहनाना प्रतिसाद दिला पाहिजेच पण संघटना व आपण वेगळे असे न होता शिक्षक,शाळा,संघटना यांच्यात एकात्मभाव निर्माण व्हावा हाच हेतू....*

*अमोल शिंदे*
*प्राथमिक शिक्षक*
*जिल्हा परिषद शाळा गायकवाड चव्हाण मळा आरग*
*ता.मिरज जि. सांगली*
9420453475

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची.. 🖋अमोल शिंदे🖋...