Thursday, 10 May 2018

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती????
*शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

🖋अमोल शिंदे🖋
9420453475
*बरं नाही खरं*

8 मे रोजी राज्यातील अंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध झाली.या यादीत 3553 शिक्षकांची बदली झाली.शासनाने राबवलेल्या ऑनलाइन पारदर्शी प्रणालीने कोणतेही व्यवहार न होता व कोणत्याही त्रासाविना या बदल्या झाल्याने ग्रामविकास विभागाचे सर्व शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचे स्वागत करत आहेत.10 ते 15 वर्षाने 500 ते 700 किलोमीटर वरून आपल्या जिल्ह्यात बदली मिळण्याचा आनंद वेगळाच असतो. बदल्यांच्या यादीत नावे आली खरी पण या अगोदर यादीत नावे आलेले कोकणातील शिक्षक अजूनही तेथेच अडकून आहेत.तर आताच्या यादीत नावे आली असली तरी 10 टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त राहत असल्याने या शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार नसल्याची भूमिका काही जिल्हा परिषदानी घेतली आहे.तर जागा रिक्त आहेत त्यात आमचा काय दोष? असा शिक्षक प्रश्न करत आहेत.पण एका जिल्ह्याने कार्यमुक्त करायचे एकाने नाही असे न करता राज्यातील सर्वच जिल्ह्यांनी 100 टक्के शिक्षकांना कार्यमुक्त करावे हीच मागणी एकमुखी करायला हवी.कोकणातील शिक्षकांच्या या दुसऱ्या टप्प्यात बदल्या न झाल्याने त्यांच्या मनात अन्यायाची भावना आहे.तसेच सिनियरला डावलून ज्युनियरची बदली झाली असल्याची व बदली मागितले नसताना बदली झाल्याचे मेसेज समाजमाध्यमावर फिरत असल्याने बदलिबाबत चर्चा रंगत आहेत. पण ही बदली प्रक्रिया अत्यन्त चांगली असून जास्तीत जास्त लोक आपापल्या जिल्ह्यात जाण्यासाठी फलदायी ठरली आहे. याबद्दल ग्रामविकास विभागाचे अभिनंदन.ज्यांची बदली झाली नाही त्यांनी निराश होऊ नये येत्या काळात त्यांची ही बदली होईल.थोडा संयम सध्या गरजेचा.बदलीच्या निमित्ताने राज्यातील रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या पदांचा विषय ऐरणीवर आला असून शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक वर्गाला शिक्षक उपलब्ध असणे बंधनकारक असताना,गेली सात वर्षे शिक्षकांची भरती बंद केल्याने हजारो वर्गामध्ये शिक्षकाविना विद्यार्थी शिकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.ही कोंडी फोडायची असेल तर नवीन शैक्षणिक वर्षात सर्व वर्गावर शासकीय नियमानुसार100 टक्के मंजूर शिक्षक पदांची भरती केली पाहिजे.राहिलेल्या आंतरजिल्हा बदल्या ही तात्काळ पुर्णत्वास नेत भविष्यात,जास्तीत जास्त शिक्षक आपापल्या जिल्हा/विभागात नोकरी लागतील अशी व्यवस्था केली पाहिजे.राज्याच्या ग्रामविकास विभागाने अंतर जिल्हा बदलिबाबत एक उत्तम प्रक्रिया राबवली असून लवकरच शिक्षक भरतीबाबत ही असेच प्रभावी पाऊल उचलत शिक्षक भरती व बदली पूर्णत्वास न्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.इतक्या मोठ्याप्रमानावर बदल्या करून ग्रामविकास विभागाने शिक्षकांना सुखद अनुभव दिला आहे.कोकणातील जिल्ह्यांनी तेथील शिक्षकांना कार्यमुक्त करत,शिक्षक भरतीसाठी आग्रही भूमिका घ्यायला हवी.शिक्षकांची अडवणूक करून भरतीचे अधिकार शिक्षकांना नाहीत.यासाठी भरतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा हवा.

*लवकर भरती झाल्यास जिल्हाअंतर्गत बदलीत ही दिलासा शक्य..*
भरती होणार असेल तर समाणिकरणासाठी जिल्हाअंतर्गत बदलीत बदल्या करू नयेत.सर्व रिक्त जागा जिल्हाअंतर्गत बदल्यात खुल्या केल्या तर जिल्ह्यांतर्गत बदलीस सुरू असणारा विरोध पूर्ण कमी होईल.बदल्यानंतर राहिलेल्या रिक्त जागांवर मेरिटनुसार नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापणा द्याव्यात.सध्या परजिल्ह्यात नोकरी करून आलेले व नुकतेच 10 वर्षे पूर्ण झालेले तसेच जिल्ह्यात नुकतीच 10 वर्षे सेवा पूर्ण होत आहे असे ज्युनियर शिक्षक जिल्हाअंतर्गत बदलीत गेली सात वर्षे भरती नसल्याने समाणिकरणात अनेक जागा ब्लॉक झाल्याने तालुक्यांच्या बाहेर जाणार व नवीन येणारे लोक समाणिकरणात जागांवर पदस्थापित झाल्यास पुढील दहा वर्षे या वर्षी प्रशासकीय कारणाने बदली झालेला सर्वात सेवा कनिष्ठ शिक्षक परत इच्छित ठिकाणी येण्याची आशा धूसर आहे त्या सर्वांना दिलासा देण्यासाठी जिल्हाअंतर्गत बदली पूर्वी भरती बाबत नेमकी भूमिका शासनाने स्पष्ट केल्यास अनेक बाबीत स्पष्टता येऊन प्रक्रिया अधिक सुलभ होतील.*

राज्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शाळांत व खाजगी अनुदानित शाळात होते.पण गेल्या सात वर्षातील शिक्षक भरती न केल्याचा फटका सर्वाधिक या शाळांनाच बसला आहे.जिल्हा परिषद शाळात शिक्षक भरती राज्यस्तरावरून शासनाकडून केली जाते.सध्या अनेक पदे रिक्त असल्याने यासर्व शाळा अडचणींना तोंड देत आहेत.अनेक डी. एड. व बी.एड झालेले तरुण-तरूणी बेकार आहेत.सरकारी शाळांचा पट काही ठिकाणी कमी झाला याला सर्वात महत्वाचे कारण शिक्षक संख्या कमी असणे व भौतिक सुविधांची कमतरता असणे ही आहेत.पण याकडे दुर्लक्ष करत तात्पुरती मलमपट्टी करत समाणिकरण,कमी पटाच्या शाळा बंद करणे हे अघोरी उपाय केले जात आहेत.ज्याच्यामुळे खेडोपाडी, दुर्गम भागात,विरळ वस्तीत रहाणाऱ्या मुलांचे शिक्षण हिरावेल काय?असा प्रश्न पडतो.तात्पुरती मलम पट्टी करून हा विषय संपणार नाही.पट कमी झाला म्हणून शाळा बंद करण्यापेक्षा तो पट कमी होण्याची कारणे शोधली पाहिजेत.आरटीई ची सोयीनुसार अमलबजावणी न करता 100 टक्के अमलबजावणी गरजेची आहे.सरकारी शिक्षण व्यवस्था हा पाया असून तेथे 100 टक्के शिक्षक पदे भरली गेली पाहिजेत.शिक्षक संघटनांनी ही शिक्षक भरतीसाठी आक्रमक होणे गरजेचे आहे....

भरती केली तर बदल्या कशा होणार??
*गेली काही वर्षे आंतरजिल्हा बदली प्रकरणे निकाली काढायची असल्याने नव्याने भरती केली तर बदल्या होणार नाहीत असे सांगितल्याने शिक्षक संघटना ही याबाबत गप्प आहेत.पण जर राज्यस्तरावरून भरती होणार असेल तर भरती करताना राज्याच्या एकूण पदे व रोष्टर याप्रमाणे भरती केली की पुन्हा जिल्हा देताना रोष्टरचा विचार न केल्यास अनेक समस्या सुटू शकतात.आज प्रत्येक जिल्ह्यात अनुसूचित जमाती(एस.टी.)प्रवर्गातील शिक्षक आहेत ते बहुसंख्य नंदुरबार,पालघर,ठाणे,धुळे या जिल्ह्यातील आहेत अन ते राज्यात सर्व जिल्ह्यात नोकरीस आहेत. या सर्वांना आपापल्या जिल्ह्यात बदली व्हावी वाटते पण जिल्ह्याचे रोष्टर असल्याने हे सर्व लोक आपल्या जिल्ह्यात जाऊ शकत नाहीत.पण हे शिक्षक जर त्यांच्या परिसरात नोकरीस असतील तर स्थानिक भाषा,व तेथील सामाजिक,भौगोलिक परिस्थिती यांची जाण असल्याने ते तेथे अधिक प्रभावी काम करू शकतात. त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत  बदली वेळी जिल्हानिहाय रोष्टर न ठेवता राज्यस्तरावर फक्त भरतीवेळी रोष्टर नुसार भरती करून मेरिट नुसार समुपदेशनाने प्रथम पदस्थापणा व बदली वेळी सेवाज्येष्ठतेनुसार बदली केल्यास अनेक समस्यां सुटतील.*

अमोल शिंदे
*जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली*
9420453475
amol.mallewadi@gmail.com

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची.. 🖋अमोल शिंदे🖋...