*शिक्षणाचे माध्यम : ट्रेंड आणि सत्य* -
अमोल शिंदे 9429453475
अन्न, वस्त्र,निवारा या मूलभूत गरजांमध्ये कालानुरूप बदल वाढ होत आरोग्य व शिक्षण या दोन गरजांची भर मूलभूत गरजांमध्ये भर पडली.शिक्षण ही आज या सर्वामध्ये महत्वाची गरज निर्माण झाली.महाराष्ट्राचा विचार केल्यास एकीकडे दुर्बल,वंचीत घटकातील मुलं शाळाबाह्य राहू नयेत ते शिक्षणाच्या प्रवाहात यावेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत.तर दुसरीकडे मध्यम,उच्च मध्यम वर्गीय पालक आपल्या मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा याबाबत प्रचंड गोंधळलेला आहे.शाळा हा प्रतिष्ठेचे मानक बनत असून शिकणाऱ्या मुलाचा विचार न करता एक ट्रेंड म्हणून आपल्या मुलांना इंग्रजी शाळात प्रवेश घेण्याचा सपाटा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.खेडोपाडी इंग्रजी शाळा निघत आहेत.त्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना तरी इंग्रजीविषयाचे पुरेपूर ज्ञान आहे का?आशा शुद्ध व्यावसायिक हेतूने सुरू असणाऱ्या शाळात मुलं पाठवली तर त्यांचा सर्वांगीण विकास होईल काय?केजी टू पीजी सर्व शिक्षण इंग्रजीतून शिकले तरच स्पर्धेच्या युगात मुलं टिकेल असा समज पसरवला जातोय तो अयोग्य आहे.
आपल्या मुलाला कशासाठी शिकवायचे?असे विचारल्यास शिक्षणातून चांगले करियर घडावे म्हणून असे उत्तर बहुसंख्य पालक देतात.चांगले करियर म्हणजे काय?असे विचारल्यास चांगल्या पॅकेजची नोकरी मिळायला हवी असे सांगतात.नोकरी म्हणजे करियर असा समज आजही कायम आहे.अन हे करायचे असेल तर सर्व शिक्षण इंग्रजीतून घ्यायला नको काय?म्हणून आम्ही राजुला इंग्रजी शाळेत घातला आहे.किती छान तो इंग्रजी बोलू लागला आहे.आम्हालाही कळत नाही पण फडाफड बोलतोय असे अभिमानाने पालक सांगत असतात.मातापित्यांची मुलांच्या शिक्षणात व त्यांना सुजाण नागरिक घडवण्यात महत्वाची भूमिका असते.मातापित्यानी असे वातावरण निर्माण केले पाहिजे की मुलं मोकळेपणाने प्रश्न विचारू शकेल,उत्तर मिळवू शकेल व त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधू शकेल.पण घरातील संभाषणाची भाषा व शाळेतील शिकण्याची भाषा वेगळी असेल.शाळेतील भाषा घरात सर्वाना परिपूर्ण अवगत नसेल तर त्या शिकणाऱ्या मुलाला पडलेले अनेक प्रश्न अनुत्तरित रहातात व तो शाळा व घर या दोन्ही ठिकाणी मुक्तपणे संवाद साधू शकत नाही.याचा विपरीत परिणाम बालकाच्या सर्जनशीलतेवर होतो.
आपल्याला ज्या प्रकारचा समाज घडवायचा आहे त्याप्रकारचे शिक्षण आपण दिले पाहिजे.इंग्रजानी 1835 मध्ये लॉर्ड मेकॅले यांच्या डोक्यातून आलेली शिक्षणपद्धती भारतात रुजवली.ज्या शिक्षणव्यवस्थेचे ध्येय स्थानिक लोकांची विचारशक्ती वाढू नये असे होते.इंग्रजांना त्यांच्या भाषेत,त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा नोकरवर्ग हवा होता.त्यांचा हा हेतू त्यांनी भाषेच्या व शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केला.इंग्रजी भाषेमुळे इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करणे सोपे झाले म्हणताना इंग्रजी ही त्यांची मातृभाषा होती हे आपण विसरतो.इंग्रजानी कोणत्याही देशावर राज्य करताना स्वतःच्या मातृभाषेचा आधार घेतला.स्वातंत्र्य मिळवून 70 वर्षांनंतर पुन्हा एकदा मेकॅले च्या शिक्षण पद्धतीप्रमाणे इंग्रजी फडाफड बोलणारा पण विचारशक्ती पुरेशा प्रमाणात विकसित न झालेला उच्च शिक्षित नोकरवर्ग तयार करणे हाच उद्देश प्राथमिक शिक्षण मातृभाषेत न घेता परकीय भाषेत घेताना साधला जात नाही काय?
खरे शिक्षण मानवाची प्रतिष्ठा व आत्मसन्मान वृद्धिंगत करते.एकंदरीत शिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र उभारणीच्या क्षमता निर्माण करणे हे असले पाहिजे.याचा विसर पडून तो एक उत्तम नोकर बनवण्यासाठी चाललेली धडपड चिंताजनक आहे.नोकरी शोधणारे बनण्यापेक्षा नोकरी निर्माण करणारे व्हा ही जाणीव त्यांच्यात निर्माण करण्याने सर्जनशीलतेला चालना मिळू शकेल.तसेच हे शिक्षण घेत असताना मुलं नेहमी आंनदी राहिले पाहिजे याची ही दक्षता घेतली पाहिजे.
आज अगदी ग्रामीण भागातही आपल्या पाल्याला इंग्रजीतून शिकवण्याबाबत पालक आग्रही दिसतात. इंग्रजीही संपर्क भाषा आहे.ती उत्तम बोलता यावी,समजावी ही अपेक्षा असणे रास्तच.पण सर्वच विषय इंग्रजीतूनच शिकावेत याची खरच गरज आहे काय?इंग्रजी चांगलं बोलता आले म्हणजे विद्यार्थी ज्ञानसंपन्न झाला असे म्हणता येईल काय?मगतर इंग्लड मध्ये जन्माला आलेला व इंग्रजी अवगत असणारा शाळेत न जाता ही अव्वल ठरेल. संपर्क भाषा व ज्ञान भाषा यामध्ये खूप तफावत आहे.एखादी भाषा बोलता येणे यात अभासापेक्षाही सवयीचा भाग अधिक आहे.गावाकडे शाळेत शिकलेला पण व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास असणारा विमानतळावर काम करणारा सफाई कामगारही इंग्रजीत उत्तम संभाषण करतो,महाराष्ट्रातून आंध्रप्रदेश मध्ये गेलेले गलाई व्यवसायिक उत्तम तेलगू बोलतात तर आंध्र प्रदेशातून बोअरवेल खुदाई मशीनवर काम करण्यास आलेले कामगार उत्तम मराठी बोलतात,आईस्क्रीमवाले राजस्थानी उत्तम मराठी बोलतात ते कुठल्या शाळेत जाऊन शिकले काय ही भाषा?ते ती भाषा सहवासातुन शिकतात.मग इंग्रजी ही संपर्क भाषा म्हणून अवगत करण्यासाठी सगळे विषय इंग्रजीतून शिकण्याची गरज नाही.उलट इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून उत्तम रीतीने शिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे.अन इतर विषयाचे शिक्षण हे मातृभाषेतूनच घेतले पाहिजे.
शिकण्यासाठी विचार करण्याचं, कल्पनाचित्र रंगवण्याचे स्वातंत्र्य आवश्यक असते.या दोन्ही गोष्टी शिक्षकाने व शाळेने सहजपद्धतीने द्यायला हव्यात.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आव्हानात्मक प्रश्न विचारले पाहिजेत.त्यांना त्यावर विचार करू दिला पाहिजे.मग त्या प्रश्नाची उत्तरे घेऊन यायला लावले पाहिजे.पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तो विद्यार्थी मातृभाषेतूनच शिकेल.इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या घरी सर्वजन मराठी बोलतात.शेजारी मराठी बोलतात.नातेवाईक मराठीतच बोलतात. मित्रासोबत संभाषण मराठीतच होते.तर शाळेत शिकताना तो इंग्रजीत शिकेल मात्र विचार मराठीतून करेल.हे करताना इंग्रजीतून शिकलेल्या बाबीचा मराठीत म्हणजे त्याच्या मातृभाषेत अन्वयार्थ लावेल.त्यावर मराठीत म्हणजे त्याच्या मातृभाषेत विचार करेल.त्यांनतर ते मराठीत विचार केलेले इंग्रजीत सादर करण्याचा प्रयत्न करताना अनेक बाबीचा गोंधळ त्या बालकाचा उडतो अन अध्ययनातील गती व रुची दोन्ही कमी होते.
शाळेत दाखल झाल्यावर सुरवातीला चार इंग्रजी कविता,गुड मॉर्निंग,गुड नाईट मुलगा म्हणाला की आईबाबांच्या आनंदाला पारावार उरत नाही व आपला मुलगा खूप भारी शिकत आहे असा समज ते करून घेतात.पण जस जसा अभ्यासक्रम विस्तारत जाईल तस तसा तो त्या विद्यार्थ्याला उमजत नाही व पालकांना समजत नाही.अनेक सवाल त्याच्या मनात निर्माण होतात पण त्याची उत्तरे सापडत नाहीत कारण सुरवातीपासून समजण्यापेक्षा दाखवण्यावर भर असल्याने पोपटपंची सवय लागते.असे होऊन गेल्या एका वर्षात जवळपास 14 हजार विद्यार्थ्यानी महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमातून मध्येच पुन्हा मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतले आहेत.मध्येच माध्यम बदलल्याने पुन्हा त्या विद्यार्थ्याचा गोंधळ उडतो त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचे माध्यम निवड करताना विचारपूर्वक निवडणे गरजेचे.अन शास्त्रीयदृष्टया ते माध्यम मातृभाषा हेच असावे.
भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन अब्दुल कलाम साहेब शिक्षणातून आयुष्यभर शिकत रहाणारा स्वतंत्र ज्ञानोपासक घडवणे हे ध्येय असावे असे म्हणत.पण प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून न मिळाल्यास असे नवनिर्मितीचा आंनद घेणारे ज्ञानोपासक घडणे कठीणच.इंग्रजी भाषा अथवा इतर भाषा आपल्या व्यक्तिमत्व विकासात भर घालते. पण ती भाषा श्रेष्ठ व आपली कनिष्ठ समजणे कोतेपणाचे ठरेल.इंग्रजी भाषेत महान ग्रंथ संपदा निर्माण झाली,निरनिराळे शोध लागले,औद्योगिक क्रांती झाली याचे श्रेय या भाषेला आहे.पण यातील बहुसंख्य लेखक,कवी किंवा शास्त्रज्ञ यांची मातृभाषा इंग्रजी होती किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे लक्षात घ्यावी लागेल.
जगातील मुख्य विकसित देशांचा विचार केल्यास त्यांच्या देशात त्यांच्या भाषेचाच मुख्यत्वे करून वापर केला जातो.चीन,जपान,फ्रान्स,जर्मनी,रशिया या देशात कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही.या देशात शिक्षणाचे माध्यम हे त्यांची मातृभाषा आहे.इंग्रजी भाषा शिकण्यास केवळ संपर्क भाषा म्हणून प्रोत्साहन दिले जाते.नुकत्याच एका कार्यक्रमात देशाचे उपराष्ट्रपती एम.वेकैय्या नायडू यांनी जन्म देते ती माता,जेथे जन्म लाभतो ती जन्मभूमी,ज्यांचा वारसा लाभतो तो मातृभूमी आणि जीचे मातेच्या गर्भात आपल्या व्यक्तिमत्वाशी नाते जोडले जाते ती मातृभाषा यांचा सन्मान हेच कोणत्याही व्यक्तीचे सर्वोच्च जीवन मूल्य असायला हवे असे प्रतिपादन केले.याचा विचार करत सरकारने मातृभाषेतुन प्राथमिक शिक्षण घेण्याबाबत व देण्याबाबत समाजात जाणीव जागृतीसाठी कृती कार्यक्रम राबवण्यास प्रयत्न केले पाहिजेत.अनेकदा प्रशासकीय कामकाज,न्यायालयीन कामकाज यामध्येही त्या त्या राज्याची मातृभाषा वापरास प्राधान्य दिले पाहिजे.जेव्हा अध्ययन उद्देशपूर्ण असते,तेव्हा सर्जनशीलता बहरते. सर्जनशीलता बहरते,तेव्हा विचार उत्पन्न होतात.विचार उत्पन्न होतात तेव्हा ज्ञान पूर्णतः प्रकाशित होते.जेव्हा ज्ञान प्रकाशित होते तेव्हा अर्थ व्यवस्थेची भभराट होते.देशाच्या आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक विकासाचा मार्ग मातृभाषेतून शिक्षणातूनच जाणार असल्याने,सुजाण पालक ,शिक्षक व शासन यानी शाळा फक्त शैक्षणिक केंद्र नाही तर ज्ञान व कौशल्य केंद्रे बनली पाहिजेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.फक्त दिखावा व स्टेटस सिंबॉल म्हणून शाळांची माध्यमे न निवडता शास्त्रीय दृष्टया अभ्यास करून मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेताना,इंग्रजी ही जागतिक संपर्क भाषा असल्याने ती आत्मसात करावी यासाठी प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांच्या सर्जनशिलतेस प्रोत्साहन मिळेल.
अमोल शिंदे
(उपक्रमशील प्राथमिक शिक्षक)
9420453475
Email- amol.mallewadi@gmail.com
No comments:
Post a Comment