*तुटलेली फुले,*
*"सुगंध" देऊन जातात...🌹*
*गेलेले क्षण,*
*"आठवण" देऊन* *जातात...💧💧*
*प्रत्येकांचे "अंदाज"*
*वेग-वेगळे असतात...*
*म्हणुन काही माणसं "क्षणंभर",*
*तर काही "आयुष्यभर" लक्ष्यात राहतात...!!*
💐💐💐माझे आजोबा श्रीमंत मायगोंडा पाटील(मंगसुळी)बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
बेळगाव कारवार निपाणी सह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अखेरच्या श्वासापर्यंत उराशी बाळगणारे व महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगाव करांच्या भावना लक्षात घेत ज्या पोटतिडकीने या प्रश्नाबाबत लढा देत बेळगावकरांना ताकत दिली पाहिजे होती ती दिली नाही ही खंत व्यक्त करणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे खन्दे शिलेदार श्रीमंत मायगोंडा पाटील (मंगसुळी)यांचे शनिवार 23 डिसेंबर 2017 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.आणखी एक शिलेदार स्वप्न अधुरे ठेवून काळाच्या पडद्याआड गेला.कैलासवासी श्रीमंत पाटील(बापू)माझे आजोबा एक तत्वनिष्ठ व अभ्यासू व्यक्तिमत्व...
तत्कालीन सातवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गावातील पोस्ट मास्तर म्हणून लागलेली नोकरी सोडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत स्वतःला झोकून दिले.घर,प्रपंचा याबाबीकडे दुर्लक्ष करत बॅरिस्टर जी.डी.पाटील यांच्या सोबत सातत्याने चळवळीत सक्रिय असणारे बापू उत्तम वक्ते होते.कन्नड,मराठी,हिंदी या तिन्ही भाषा उत्तम अवगत होत्या.तर इंग्रजी ही चांगली.वाचनाचा व फिरण्याचा छंद.कोणाला बरं वाटावे म्हणून कधीच ते बोलत नसतं.जे काही बोलायचे थेट.
मंगसुळी हे मिरज तालुक्याच्या सीमेवरील गाव तसे कर्नाटकात असले तरी सगळा संपर्क आरग व मिरज यांच्याशीच.मूळचे मंगसुळी गावचे असणारे बॅरिस्टर जी.डी.पाटील हे मिरजेचे आमदार झाले व विधानसभेत पोहचले इतकं मंगसुळी व सीमावर्तीय गावांचे,मिरज व परिसराशी घनिष्ठ नाते...माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची ही या गावावर विशेष मर्जी होती.वसंतदादानी सुरू केलेल्या अनेक संस्थांत येथील तरुण नोकरी करत.कायद्याने कर्नाटक व मनाने महाराष्ट्रीय असणारे मंगसुळी गावातील बहुसंख्य नाते संबंध ही सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातच आहेत.मंगसुळीचा खंडोबा हे तर अनेकांचे श्रद्धास्थान.
मंगसुळी गावात शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते.या शिवजयंती उत्सवाची सुरवात करणाऱ्या त्यावेळच्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक श्रीमंत पाटील(बापू)हे प्रमुख कार्यकर्ते.बॅरिस्टर सोबत तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक व शंकर राव चव्हाण यांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री जेवण करत असताना घेतलेली भेट व त्यावेळी झालेली शाब्दिक चकमक व बॅरिस्टर सीमाभागातील गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी किती आग्रही होते हे सांगताना डोळ्यात पाणी आलेले पाहिले की काय तडफ असते कार्यकर्त्याची आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यँत.जगात पैसा,नाव,प्रतिष्ठा यासाठी अनेकजण वेडे आहेत पण चळवळीतील कार्यकर्ते आपल्या ध्येयाने शेवट पर्यंत बांधलेले असतात याची जाणीव झाली.आर्थिक परिस्थिती बेताची पण वाचनाची आवड व अन्यायाविरुद्ध कोणासोबत ही टक्कर घेण्यास तयार असणारे व्यक्तिमत्व.पुढे कर्नाटकातून येणारे व बराच काळ केंद्रिय मंत्री असणारे बी.शंककरानंद यांचे व बापूंचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध निर्माण झाले ते अखेर बी. शंकरानंद यांच्या मृत्यूपर्यंत.जवळपास 15 वर्षे मंगसुळी ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष,कृषी पत्तीन बँकेचे चेअरमन म्हणून बापूंनी लक्षवेधी कामकाज केले.आयुष्यात काहीकाळ मात्र अत्यन्त बिकट व वाईट काळातून जावे लागले तरी कधीही न खचता आपल्या तत्वांशी ते घट्ट राहिले.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देशाच्या राजकारणातील चढउतार व वैचारिक बदल याबाबत अत्यन्त स्पष्ट मते होती.10 डिसेंबरला माझी व बापूंची शेवटची भेट झाली.तब्बेत बरी नाही म्हणून भेटायला गेलो होतो.पण स्वतःच्या आजारपणाबाबत न बोलता देशाचे राजकारण,कर्नाटकातील राज्य सरकारची शेतकरी हिताची धोरणे व महाराष्ट्रातील सरकारने कर्जमाफी मध्ये घातलेल्या अटी व नियम याविषयीच बापू बोलत होते.आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत शरीराने साथ सोडली पण बुद्धीने व वाणीने अत्यन्त तल्लख बापू काळाच्या पडद्याआड गेले अन एक जिवंत पुस्तक,मार्गदर्शक आमच्यातून कायमचे निघून गेले. रक्षा विसर्जन दिवशी कावळा नैवेद्य शिवत नाही नमस्कार करा म्हणून सांगायचे,पण कावळा निवद शिवणार नव्हता.तो शिवणार नाही असे आधीच वाटत होते कारण प्रपंचाची काळजी त्या माणसाने कधीच केली नव्हती. पण ऐन तारुण्यात घरावर तुळशीपत्र ठेवून संयुक्त महाराष्ट्राचे पाहिलेले स्वप्न अधुरेच होते अन आम्ही नातू कितीही पाया पडलो तरी तो त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र तयार करण्याचा शब्द देण्याची ताकत सध्या तरी महाराष्ट्रात कोणाच्यात दिसत नाही.त्यामुळे आणखी एक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निष्ठावान कार्यकर्त्याने अतृप्त मनाने या जगाचा निरोप घेतला...
एका निस्पृह व्यक्तिमत्वास बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली
No comments:
Post a Comment