Saturday, 30 December 2017

महाराष्ट्र एकीकरण समितीचा शिलेदार काळाच्या पडद्याआड

*तुटलेली फुले,*

   *"सुगंध" देऊन जातात...🌹*

         *गेलेले क्षण,*

  *"आठवण" देऊन* *जातात...💧💧*

     *प्रत्येकांचे "अंदाज"*

   *वेग-वेगळे असतात...*

 *म्हणुन काही माणसं "क्षणंभर",*

*तर काही "आयुष्यभर" लक्ष्यात राहतात...!!*

💐💐💐माझे आजोबा श्रीमंत मायगोंडा पाटील(मंगसुळी)बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

बेळगाव कारवार निपाणी सह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अखेरच्या श्वासापर्यंत उराशी बाळगणारे व महाराष्ट्रातील  नेत्यांनी बेळगाव करांच्या भावना लक्षात घेत ज्या पोटतिडकीने या प्रश्नाबाबत लढा देत बेळगावकरांना ताकत दिली पाहिजे होती ती दिली नाही ही खंत व्यक्त करणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे खन्दे शिलेदार श्रीमंत मायगोंडा पाटील (मंगसुळी)यांचे शनिवार 23 डिसेंबर 2017 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.आणखी एक शिलेदार स्वप्न अधुरे ठेवून काळाच्या  पडद्याआड गेला.कैलासवासी श्रीमंत पाटील(बापू)माझे आजोबा एक तत्वनिष्ठ व अभ्यासू व्यक्तिमत्व...

तत्कालीन सातवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गावातील पोस्ट मास्तर म्हणून लागलेली नोकरी सोडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत स्वतःला झोकून दिले.घर,प्रपंचा याबाबीकडे दुर्लक्ष करत बॅरिस्टर जी.डी.पाटील यांच्या सोबत सातत्याने चळवळीत सक्रिय असणारे बापू उत्तम वक्ते होते.कन्नड,मराठी,हिंदी या तिन्ही भाषा उत्तम अवगत होत्या.तर इंग्रजी ही चांगली.वाचनाचा व फिरण्याचा छंद.कोणाला बरं वाटावे म्हणून कधीच ते बोलत नसतं.जे काही बोलायचे थेट.

मंगसुळी हे मिरज तालुक्याच्या सीमेवरील गाव तसे कर्नाटकात असले तरी सगळा संपर्क आरग व मिरज यांच्याशीच.मूळचे मंगसुळी गावचे असणारे बॅरिस्टर जी.डी.पाटील हे मिरजेचे आमदार झाले व विधानसभेत पोहचले इतकं मंगसुळी व सीमावर्तीय गावांचे,मिरज व परिसराशी घनिष्ठ नाते...माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची ही या गावावर विशेष मर्जी होती.वसंतदादानी सुरू केलेल्या अनेक संस्थांत येथील तरुण नोकरी करत.कायद्याने कर्नाटक व मनाने महाराष्ट्रीय असणारे मंगसुळी गावातील बहुसंख्य नाते संबंध ही सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातच आहेत.मंगसुळीचा खंडोबा हे तर अनेकांचे श्रद्धास्थान.

मंगसुळी गावात शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते.या शिवजयंती उत्सवाची सुरवात करणाऱ्या त्यावेळच्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक श्रीमंत पाटील(बापू)हे प्रमुख कार्यकर्ते.बॅरिस्टर सोबत तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक व शंकर राव चव्हाण यांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री जेवण करत असताना घेतलेली भेट व त्यावेळी झालेली शाब्दिक चकमक व बॅरिस्टर सीमाभागातील गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी किती आग्रही होते हे सांगताना डोळ्यात पाणी आलेले पाहिले की काय तडफ असते कार्यकर्त्याची आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यँत.जगात पैसा,नाव,प्रतिष्ठा यासाठी अनेकजण वेडे आहेत पण चळवळीतील कार्यकर्ते आपल्या ध्येयाने शेवट पर्यंत बांधलेले असतात याची जाणीव झाली.आर्थिक परिस्थिती बेताची पण वाचनाची आवड व अन्यायाविरुद्ध कोणासोबत ही टक्कर घेण्यास तयार असणारे व्यक्तिमत्व.पुढे कर्नाटकातून येणारे व बराच काळ केंद्रिय मंत्री असणारे बी.शंककरानंद यांचे व बापूंचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध निर्माण झाले ते अखेर बी. शंकरानंद यांच्या मृत्यूपर्यंत.जवळपास 15 वर्षे मंगसुळी ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष,कृषी पत्तीन बँकेचे चेअरमन म्हणून बापूंनी लक्षवेधी कामकाज केले.आयुष्यात काहीकाळ मात्र अत्यन्त बिकट व वाईट काळातून जावे लागले तरी कधीही न खचता आपल्या तत्वांशी ते घट्ट राहिले.

आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देशाच्या राजकारणातील चढउतार व वैचारिक बदल याबाबत अत्यन्त स्पष्ट मते होती.10 डिसेंबरला माझी व बापूंची शेवटची भेट झाली.तब्बेत बरी नाही म्हणून भेटायला गेलो होतो.पण स्वतःच्या आजारपणाबाबत न बोलता देशाचे राजकारण,कर्नाटकातील राज्य सरकारची शेतकरी हिताची धोरणे व महाराष्ट्रातील सरकारने कर्जमाफी मध्ये घातलेल्या अटी व नियम याविषयीच बापू बोलत होते.आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत शरीराने साथ सोडली पण बुद्धीने व वाणीने अत्यन्त तल्लख बापू काळाच्या पडद्याआड गेले अन एक जिवंत पुस्तक,मार्गदर्शक आमच्यातून कायमचे निघून गेले. रक्षा विसर्जन दिवशी कावळा नैवेद्य शिवत नाही नमस्कार करा म्हणून सांगायचे,पण कावळा निवद शिवणार नव्हता.तो शिवणार नाही असे आधीच वाटत होते कारण प्रपंचाची काळजी त्या माणसाने कधीच केली नव्हती. पण ऐन तारुण्यात घरावर तुळशीपत्र ठेवून संयुक्त महाराष्ट्राचे पाहिलेले स्वप्न अधुरेच होते अन आम्ही नातू कितीही पाया पडलो तरी तो त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र तयार करण्याचा शब्द देण्याची ताकत सध्या तरी महाराष्ट्रात कोणाच्यात दिसत नाही.त्यामुळे आणखी एक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निष्ठावान कार्यकर्त्याने अतृप्त मनाने या जगाचा निरोप घेतला...

एका निस्पृह व्यक्तिमत्वास बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली

Wednesday, 27 December 2017

कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत जुनी पेन्शन हक्क संघटनची मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत  यांच्याकडे मागणी

कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत जुनी पेन्शन हक्क संघटनची मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत  यांच्याकडे मागणी

शिक्षणसेवक कालावधी हाच परिविक्षाधीन कालावधी दोन दिवसात परिपत्रक -मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत साहेब

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत साहेब यांची भेट घेऊन  कमी पटाच्या शाळा बंद केल्यास वंचित व दुर्बल घटकातील मुले शाळेपासून दूर जाऊन शाळा बाह्य होतील म्हणून या शाळा बंद करू नयेत अशी मागणी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली.सदर निर्णय हा राज्यपातळीवर घेतला असल्याने जिल्हा स्तरावर यामध्ये बदल करता येणार नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी शिष्टमंडळास सांगितले.

यावेळी विविध प्रश्नाबाबत शिष्टमंडळाने चर्चा केली.शिक्षणसेवक कालावधी हाच परिविक्षाधीन कालावधी मानण्यात यावा असा शासन आदेश आहे.तरीही काही तालुक्यात 2001 पासून सेवेत आलेल्या शिक्षणसेवकांकडून स्वतंत्र परिविक्षाधीन कालावधी मंजुरीसाठी प्रस्ताव घेण्यात येतो ही बाब संघटनने यापूर्वी निदर्शनास आणला होता.याबाबत शिक्षणसेवक कालावधी हाच परिविक्षाधीन कालावधी मानण्यात यावा असे शासन आदेश असून याबाबत दोन दिवसात परिपत्रक निर्गमित केले जाणार आहे.

तसेच महानगरपालिकेतून अतिरिक्त झाल्याने जिल्हा परिषदेकडे समायोजनाने आलेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता त्यांच्या मूळ नेमणुक दिनांकानुसार धरूनच सर्वसाधारण सेवाज्येष्ठता यादी केली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अभिजित राऊत साहेब यांनी सांगितले.

2014 मध्ये विषय शिक्षक पदी नियुक्त झालेल्या विषय शिक्षकांना वेतनश्रेणी देण्याबाबत 14 नोव्हेंबर 2017 च्या शासन आदेशानुसार पदविधर ज्येष्ठतासूची व सामाईक ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करावी.पात्र विषयशिक्षकांना पदविधर वेतनश्रेणी देण्यात यावी अशी मागणी केली असता सदर शासन आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.त्यामुळे विज्ञान विषयाच्या विषय शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे.

अंशदान पेन्शन योजनेच्या देण्यात आलेल्या हिशेबीचीट्टी मध्ये तफावत असून सदर तफावत दुरुस्तीसाठी तालुकानिहाय नियोजन करण्यात यावे.वैयक्तिक कपातीस स्टे मिळालेल्या माध्यमिक शिक्षकांच्या अंशदान पेन्शनच्या कपाती तात्काळ थांबवण्यात याव्यात.1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांच्या अंशदान पेन्शनसाठी कपात करण्यात आलेल्या रकमा परत देण्याबाबत नुकतेच शालेय शिक्षण विभागाने कार्यपद्धती शासन आदेशाद्वारे सांगितली असून त्याप्रमाणे सदर रकमा वर्ग करण्यात याव्यात.यातील अंतर जिल्हा बदलीने गेलेल्या शिक्षकांच्या रकमा ही वर्ग करण्याची मागणी केली.यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,आटपाडी तालुकाध्यक्ष किरण सोहणी, जिल्हासंघटक राजकुमार भोसले उपस्थित होते.

Tuesday, 26 December 2017

शिक्षक आम्हाला शिकवू द्या असे म्हणत असताना संघटनांची अधिवेशने उन्हाळी सुट्टीतच घेणे नैतिक कर्तव्य

🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅
*शिक्षक आम्हाला शिकवू द्या असे म्हणत असताना संघटनांची अधिवेशने उन्हाळी सुट्टीतच घेणे नैतिक कर्तव्य*

*शिक्षकानी विशेष रजा मिळाली तरच संघटनची वर्गणी देणार ही मानसिकता सोडत संघटनांना शैक्षणिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी तयार व्हावे*
🙅🤷‍♂🙅‍♂🤷‍♀🙅🤷‍♂🙅‍♂🙅🤷‍♂

*शिक्षक संघटना, शिक्षक, पालक,समाज वेगळे आहेत असे न होता शिक्षक,शाळा, संघटना यांच्यात एकात्मभाव निर्माण व्हावा हाच खालील पोस्ट लिहण्याचा हेतू....*

✒ *अमोल शिंदे*✒
*प्राथमिक शिक्षक*
9420453475
👇👇👇👇👇👇👇👇

एकीकडे शिक्षक व शाळा विविध समस्यांनी व्यथित असताना त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यापेक्षा या अडचणींचा फायदा घेण्यासाठी काही मंडळी सरसावली आहेत.गेल्या काही वर्षांत शिक्षक संघटनांच्या नेत्यांतील आपसी मतभेद व उच्च पराकोटीचा अहंकार यामुळे कोणतेही कारण नसताना शिक्षक व शाळा यांची फरफट होत आहे.प्राथमिक शिक्षकांच्या संघटना नेहमीच मजबूत होत्या.राज्यातील तमाम शिक्षकांनी या संघटनांना नेहमीच भरभरून प्रेम व आर्थिक पाठबळ दिले.यातूनच काही शिक्षक नेत्यांना आमदार होता आले.ही ताकत शिक्षकांची आहे.शिक्षक संघटनांची स्वतःची स्थावर मालमत्ता,सभागृहे,विद्यालये, शिक्षक भवने अस्तित्वात आली.ही बाब शिक्षक व संघटनांच्या दृष्टीने अभिमानाची पण काळाच्या ओघात या संघटना अन त्यांची मालमत्ता प्रायव्हेट लिमिटेड आपल्या खाजगी मालकीच्या असाव्यात अशी भावना शिक्षक नेत्यांच्या झाल्या.अन त्यातूनच विघटनास सुरवात झाली. *1970 ते 2000या कालखंडात संघटनांनी खुपच नेत्रदीपक कार्य केले.शिक्षकांना मान,सन्मान मिळवून दिला.पण 2000  नंतर शिक्षण सेवक,2005 मध्ये अंशदान पेन्शन योजना व 23 ऑक्टोबर 2017 ला आलेला वरिष्ठ वेतन श्रेणी बाबत आदेश गेल्या 17 वर्षात शिक्षक संघटनांच्या घसरलेल्या प्रभावाचे द्योतक आहेत.*

काळाच्या ओघात नेतृत्वात होणारा बदल न करता संघटनेचे नेतेपद हे सत्ता स्थान असून त्यावर आपलेच नियंत्रण हवे यासाठी सुरू झालेल्या संघर्षात शिक्षक,शाळा, त्यांच्या समस्या मागे पडल्या.प्रबळ संघटना व आर्थिक गणित यामुळे नेत्यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या.राज्याच्या नेत्यांना आमदार,जिल्ह्याच्या नेत्याला शिक्षक बँकेचा चेअरमन, तालुक्याच्या नेत्याला शिक्षक पतसंसंस्थेचा चेअरमन होणे व त्यातून स्वतःची आर्थिक प्रगती साधने हे ध्येय बनले.आंदोलन व चळवळ यापासून दूर जात आपापसात वळवळ करण्यातच सगळे रममाण दिसतात.मग पुढे राज्यात शिक्षक संघटना राजकीय पक्षांच्या दावणीला बांधल्या गेल्या अन खऱ्या अर्थाने संघटना अस्तित्वहीन होत चालल्या.

शिक्षक संघटनांची अधिवेशने अत्यन्त भरगच्च व निर्णायक होत.अनेक शिक्षक हिताचे निर्णय संघटनांच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून होत.अन त्यामुळे संघटनांच्या अधिवेशनाना मोठा प्रतिसाद शिक्षक देत.या अधिवेशनात शिक्षक नेते, प्रशासकीय अधिकारी,पदाधिकारी,मंत्री एकत्र येत व शिक्षण विषयक उहापोह व्हायचा व एक सर्वसमावेशक कार्यक्रम घेऊन पुढे जात.नक्कीच अशी अधिवेशने व्हावीत असे शिक्षकांना वाटायचे.पण गेल्या काही वर्षांत ही संघटनांची अधिवेशने विवादाचा विषय बनली आहेत.संघटनांच्या अधिवेशनासाठी शिक्षकांना ऑन ड्युटी विशेष रजा शासन मंजूर करत.अधिवेशनासाठी संघटना वर्गणी गोळा करत,जो पावती घेईल त्याला तो अधिवेशनास न जाता अधिवेशनात उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र दिले जायचे.जाणाऱ्याला ही मिळते न जाणाऱ्याला ही उपस्थिती प्रमाणपत्र मिळते मग प्रवास खर्च करून कशाला अधिवेशनाला जायचे घेऊ निवांत विश्रांती अशी भावना वाढीस लागली.शिक्षकांची राज्यभरातील संख्या व या पावत्या मधून गोळा होणारा पैसा हेच संघटनांच्या विघटनाचे प्रमुख कारण बनले.अधिवेशन पावत्यासाठी झाली,शिक्षकांची अधिवेशन स्थळी उपस्थिती घटली, अधिवेशनातील रिकाम्या खुर्च्या व दुसरीकडे शिक्षकाविना रिकाम्या शाळा असे चित्र अधिवेशन काळात निर्माण होऊ लागले अन त्यामुळेच या अधिवेशनाबाबत प्रश्न माध्यमे विचारू लागली.

बहुसंख्य शिक्षक रजा मिळते म्हणून पावती घेत व अधिवेशनास मात्र जात नाहीत,काहीजण सहलीला जातात तर बरेच घरी राहतात अन काही पावती घेऊन ही शाळेस जातात.शेवटी शिक्षकी पेशा व सामाजिक बांधिलकी एकाच नाण्याच्या दोन बाजू.जर अधिवेशन रजा घेतली आपण शाळेत गेलो नाही तर अधिवेशनास उपस्थित रहाणे हे नैतिक कर्तव्य पण संघटना अधिवेशनाची जाहिरात करताना अधिवेशनाचा उद्देश,तेथे कोणत्या विषयावर चर्चा होणार,शिक्षक सक्षमीकरणासाठी कोणता कार्यक्रम हाती घेणार याचा प्रचार व प्रसार न करता आपणाला किती दिवस रजा मिळणार व कोठे फिरता येणार याची जाहिरात करतात यातूनच या अधिवेषणांचा घसरलेला स्तर व भरकटलेली दिशा स्पष्ट होते.

असे एक चित्र असले तरी यातून काही हाताच्या बोटावर मोजता येईल इतके नेते लाभार्थी झाले त्यांचे वैभव व डामडौल पाहून प्रत्येकाला शिक्षक संघटनातील नेत्यांना अधिवेशन व इतर बाबीतून खूप आर्थिक लाभ होतो असा समज निर्माण झाला.पण वास्तव वेगळेच असून आजही हजारो शिक्षक नेते तन, मन,धनाने शाळा व शिक्षक हितासाठी झटत आहेत.अन हे कार्य करताना त्यांना आर्थिक पाठबळ असणे गरजेचे आहे.यासाठी शिक्षकांनी विशेष रजा मिळाली तरच संघटनेची वर्गणी देणार ही मानसिकता सोडणे गरजेच आहे.आपले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपण संघटित असणं गरजेचेच आहे.अन आजच्या काळात संघटन निर्माण करणे व ते चालवणे यासाठी आर्थिक बाब लागतेच अन त्या संघटनेच्या किमान खर्चाची तरतूद सभासदांनी दिलेल्या वर्गणीतून व्हायला कोणाचा आक्षेप नसावा.पण एक काळ विशेष रजेसाठी पावती हा निर्माण झालेला पायंडा बदलून संघटन खर्चासाठी वर्गणी देण्यास शिक्षकांनी पुढे आल्यास शिक्षक नेतेही नक्कीच सुट्टीत अधिवेशन घेण्यास तयार होतील. *संघटनात्मक कामासाठी वर्गणी देऊ पण शाळेला सुट्टी नको ही भूमिका सर्व शिक्षकांनी घ्यायला हवी.*

सध्या शिक्षक व शाळा यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत.राज्यातील 1314 शाळा बंद करण्याचा निर्णय होत झाला तर दुसरीकडे खाजगी कंपनीना शाळा उघडण्यास मान्यता देत शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना त्याविरुद्ध *हिवाळी अधिवेशनात रस्त्यावर उतरून यलगार न पुकारता अधिवेशनाला विशेष रजा मंजुरीसाठी संघटनांचे नेते मंत्र्याचे उंबरठे झिजवत आहेत हे नक्कीच भूषणावह नाही.*शिक्षक स्वाभिमानी आहेत अन ते गोर गरिबांच्या शाळा टिकाव्यात व बहुजनांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देता यावे यासाठी आम्हाला शिकवू द्या अशी आर्त हाक देत असताना संघटनांनी मात्र उन्हाळी सुट्टीत अधिवेशन न घेता शाळेच्या वेळातच अधिवेशन घेण्यासाठी चालवलेली धडपड शिक्षक एका दिशेला तर शिक्षक संघटनांचे नेते दुसऱ्या दिशेला असल्याचे स्पष्ट करते.

भारतीय संस्कृतीत शिक्षकाचे स्थान मातापित्यानंतर पण परमेश्वराच्या अगोदर आहे.शिक्षकांनी अत्यन्त सचोटीने कार्य करत समाजात स्वतःचे स्थान अबाधित ठेवले असून त्यास धक्का लागणार नाही याची दक्षता घेणे ही शिक्षक संघटना व शिक्षक नेत्यांची जबाबदारी नव्हे कर्तव्यच आहे. *संघटनांच्या नेत्यांनी शिक्षक व समाजमन याचा आदर करत फुटकळ विशेष रजेसारख्या गोष्टीसाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत.त्यापेक्षा 1314 शाळा बंद करण्याचा निर्णय,खाजगी कंपनीना शाळा काढण्यास परवानगी देणारे विधेयक, 23 ऑक्टोबर 2017 चा वरिष्ठ वेतन श्रेणी बाबतचा निर्णय,राज्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे,रखडलेल्या पदोन्नत्या,केंद्रप्रमुख व शिक्षण विभागातील रिक्त पदांची भरती,ऑनलाईन कामासाठी व्यवस्था व डाटा ऑपरेटर,सर्व विषय शिक्षकांना समान वेतनश्रेणी,अंशदान पेन्शन योजनेचा निर्णय रद्द करणे,BLO सारख्या अशैक्षणिक कामातून कायमची सुटका यासाठी  पणाला लावली तर समस्त शिक्षक स्वागत करतील.* पण सध्याचे नेते अधिवेशनासाठी एकत्र येतात व हिशेबासाठी दूर जातात हे अलीकडील युवा व बुद्धिवादी शिक्षक बंधू भगिनींच्या लक्षात आले आहे.या लोकांच्याकडे लक्ष न देता ते शाळा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत.संघटनांचे महत्व खूप आहे.पण काही स्वार्थी नेत्यांनी या संघटना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरण्याचा चंग बांधला आहे.सेवानिवृत्त शिक्षकांनी संघटनांचा व शिक्षक हिताचा सर्व भार उरावर न घेता सेवानिवृत्त लोकांच्या समस्यां सोडवण्यासाठी वेळ द्यावा व सेवेत असलेल्यानी व स्वतःला शिक्षक समजणाऱ्या व त्याचा अभिमान असणाऱ्या मंडळींनी या संघटनांचे शैक्षणिक व प्रशासनिक नेतृत्व करावे व शिक्षकांनी ही इतिहासात शिक्षक नेत्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचे दाखले देत वर्तमानातील त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करत अंद्ध समर्थन करणे बंद करावे.बदलता समाज,बदलते शिक्षण यात शिक्षक संघटनांनी काळानुरूप बदल करत स्वतःच्या भूमिकांत सकारात्मक बदल करावा.याची सुरवात अधिवेशन सुट्टीत स्वतःहून घेऊन करावीत,यामध्ये पालक उद्बोधन यासाठीही नियोजन करावे,अधिवेशनात शैक्षणिक बाबीना अधिक महत्व द्यावे व प्रशासकीय अडचणीसाठी रस्त्यावर उतरण्याचे धाडस दाखवावे तरच येणाऱ्या काळात शिक्षक संघटना व त्यांच्या अधिवेशनाना गर्दी होईलच पण दर्दी लोकांचे पाठबळ ही मिळेल....
(जो व्यक्ति अपने निर्णयों को बार-बार बदलता है , उसकी निष्पक्षता और बुद्धिमत्ता संदिग्ध रहती है ! इसीलिए नेतृत्व कर्ता को ठीक से सोच विचार कर दूरदर्शिता के साथ सही  निर्णय लेना आना चाहिए )

वरील बाबी कोणत्याही संघटना अथवा शिक्षकांना विरोध अथवा आकस यातून लिहल्या नाहीत,शिक्षक संघटनांचे योगदान महत्वाचे असून येणाऱ्या काळात संघटना अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.त्यासाठी कालानुरूप काही बदल व्हावेत असे मनापासून वाटत आहे म्हणून लिहले आहे.फक्त *शिक्षक नेत्यांवर जबाबदारी न ढकलता शिक्षकांनीच या बदलाची सुरवात स्वतः पासून करताना संघटनांच्या आवाहनाना प्रतिसाद दिला पाहिजेच पण संघटना व आपण वेगळे असे न होता शिक्षक,शाळा,संघटना यांच्यात एकात्मभाव निर्माण व्हावा हाच हेतू....*

*अमोल शिंदे*
*प्राथमिक शिक्षक*
*जिल्हा परिषद शाळा गायकवाड चव्हाण मळा आरग*
*ता.मिरज जि. सांगली*
9420453475

शिक्षक संघटनांची कंपन्यांना शाळा काढण्यास परवानगी शासन देन्याबाबत नेमकी भूमिका काय???

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*कंपन्यांना शाळा काढण्यास परवानगी दिली जात आहे.छोट्या शाळा बंद केल्या जात आहेत याबाबत शिक्षक संघटनांची नेमकी भूमिका काय??*

*आधी शाळा वाचवा मग अधिवेशने खुशाल घ्या*

🖋 *अमोल शिंदे* 🖋
9420453475

🚻🚻🚻🚻🚻🚻🚻🚻

शिक्षण विषयक एकावर एक येणारे शासन आदेश अन शिक्षणाचे बाजारीकरण यांनी समस्त महाराष्ट्राचे समाजमन हादरून सोडले आहे. फुले,शाहू , आंबेडकरांचा दिवसरात्र जप करणारे ही विधानसभेत विधेयक संमत होताना कडवा विरोध करत नाहीत.वरवर गोरगरिबांच्या शिक्षणाबद्दल कळवळा व्यक्त करत शिक्षणाकडे शुद्ध व्यावसायिक हेतूने पहाण्याची मानसिकतेची सुरवात आता झाली नाही जवळपास 15 वर्षांपासून त्याची टप्प्या टप्प्याने सुरवात झाली असून सध्या ती परमोच्च टप्प्यावर जात असताना त्याची जाणीव समाजातील विविध घटकांना होत असताना.शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख व जवळचा घटक शिक्षक.शिक्षकांना व पर्यायाने त्यांच्या संघटनांना याची चाहुल अगोदर लागून या धोरणांना कडाडून विरोधाची सुरवात त्यांच्यापासून व्हायला हवी.पण सध्या शिक्षक संघटनांची नरो वा कुंजरोवा भूमिका पाहिली तर समाज जागा झाला तरी संघटना झोपल्या आहेत काय अशीच अवस्था दिसत आहे.

नुकतेच स्वयं अर्थ सहाय्यता शाळा कंपन्यांना काढण्यास मान्यता देत राज्यातील सार्वजनिक सरकारी शिक्षण व्यवस्था व अनुदानित शिक्षण संस्था यांना भविष्यात गिळंकृत केले जाण्याकडे पाऊले पडत आहेत.हे करत असतानाच आरटीई मधील प्रत्येक मुलाला त्याच्या परिसरात प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे हे धोरण शासनाने सोडून महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या कणा असणाऱ्या द्विशिक्षकी शाळा टप्प्या टप्प्याने संपवत केंद्रीकृत शाळेकडे पाऊल टाकले आहे.यामुळे दुर्गम भागातील,वंचित घटकातील मुले पुन्हा एकदा शिक्षण प्रवाहापासून दूर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.एकीकडे 10 पटाच्या आतील शाळा बंद करत समायोजित करण्याचे आदेश पाठवताना तेथील स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती,पालक इतकेच काय जिल्हा परिषद अध्यक्षांना ही विश्वासात घेतले गेले नाही,शिक्षक संघटनांचा तर प्रश्नच नाही.इंटरनॅशनल शाळा आम्ही काढणार असे सांगितले जाते पण नेमक्या या 100 शाळा मध्ये महाराष्ट्राचे शिक्षण सिमीत होऊ शकते काय?आज शासनाच्या आहे त्या शाळांमध्ये शिक्षक व इमारत या दोन बाबी सोडल्या तर अगदी क्लार्क,शिपाई हे तर सोडा साधी वीज व इंटरनेट जोडणी नाही अन 100 इंटर नॅशनल शाळा पुढे करत हजारो गोरगरिबांच्या शाळा जेथे कष्टकरी,कामगार ,बहुजनांची मुले शिकत आहेत त्यांच्या शाळा का बंद केल्या जात आहेत??अन या इंटरनॅशनल शाळा सूरु करण्यासाठी किती तरतूद करण्यात आली आहे?खरतर विद्यार्थी हा परीक्षार्थी नाही म्हणत आता परीक्षेसाठी शाळा काढल्या जाणार आहेत काय?अगोदर किमान एक शाळा काढून तिची यशस्विता तपासली काय?राज्याच्या शिक्षणक्षेत्राची प्रयोग शाळा झाली आहे काय?

*हे सगळं होत असताना राज्यातील शिक्षण क्षेत्राबद्दल इतके महत्वाचे अन दीर्घकाल परिणाम करणारे निर्णय होत असताना राज्यातील शिक्षक संघटना व नेते जुजबी तोंडदेखली माध्यमापुरती प्रतिक्रिया,सोशल मीडिया वर वर्तमान पत्रात आलेल्या बातम्या प्रसारित करण्याच्या पलीकडे काही करताना दिसत नाहीत.या नेत्यांची या सर्व प्रक्रियेबद्दल स्वतःची मते काय?नुकतेच बदल्याबाबत सर्व शिक्षक संघटना आक्रमक झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले पण आज सरकारी व अनुदानित शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर घाव घातला जात असताना शिक्षक संघटनांचे मौन मनात अनेक प्रश्न निर्माण करते.*

*1.गेल्या काही वर्षांत शैक्षणिक धोरण ठरवताना त्यामध्ये शिक्षक संघटनांची शैक्षणिक भूमिका नेमकी काय आहे हे कधीच लक्षात आले नाही.या संघटना व नेते आता तर आपली भूमिका स्पष्ट करणार की गप्पच बसणार.*

2. पगार,बदल्या,मेडिकल बिले व शिक्षकांच्या समस्यां सोडले तर संघटनांना शिक्षणातील धोरणाबाबत कोणतेच स्वारस्य नाही किंवा सध्या तितक्या दूरदृष्टीने विचार करणारे नेतृत्व या संघटनात नाही काय?

*3.शिक्षक संघटना आपली अधिवेशने घेतात सध्या राज्याच्या शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर परिस्थिती असताना संघटना अधिवेशनाच्या तयारीत मशगुल आहेत.त्यांनी नेमके शाळांच्या बाजारीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट न करता अधिवेशनासाठी रजा मिळावे यासाठी चालवलेले प्रयत्न खूपच वेदनादायक असून संघटनांचे समाजभान हरपले आहे काय असा प्रश्न निर्माण होत आहे.*

4.महाराष्ट्राला शिक्षणक्षेत्रात उज्वल परंपरा असून सावित्रीबाई व महात्मा फुलेंचा वारसा पुढे नेणारे हजारो शिक्षक राज्यात कार्यरत आहेत.लोक सहभागातून 300 कोटी रुपयांचा उठाव शाळांनी केला आहे.या समाजात मिसळून काम करणाऱ्या शिक्षकांनी अधिवेशन कशासाठी व सध्याच्या परिस्थितीत संघटना व नेत्यांचे मौन का असा सवाल विचारायला हवा.नाहीतर आपणही या निर्णयास सहमती देतो असेच होईल.

*अधिवेशन घेण्यास विरोध नाही ती जरूर घ्यावीत पण ज्या शिक्षण व्यवस्थेवर शिक्षक व संघटना यांचे अस्तित्व अवलंबून आहे त्याबद्दल गेल्या 15 वर्षात झालेल्या बदलाबद्दल संघटना गप्प का?सरकारी शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव खेळला जात असताना समाजातील बुद्धिवादी वर्ग,सामाजिक कार्यकर्ते,विद्यार्थी संघटना यांना सोबत घेत गोरगरीब,वंचितांचे शिक्षण टिकवण्यासाठी शिक्षक संघटनांनी नेतृत्व करायला हवे.अधिवेशने अनेक घेता येतील आधी शाळा वाचवण्यासाठी पुढे यावे.*

जे शाळा बंद करत आहेत त्यांच्याकडे रजेसाठी उंबरे झिजवण्यापेक्षा सरकारी शाळा सक्षम करण्यासाठी व टिकवण्यासाठी भरीव योगदान देण्यास शिक्षक संघटनांनी सज्ज व्हावे.नॅशनल जिओग्रोफी हे चैनल आपण पहातो ते परदेशातील शिक्षक संघटनांनी विधायक दृष्टीने चालू केलेले टीव्ही चैनल आहे.पण महाराष्ट्रातील शिक्षक संघटना शिक्षक बँक व पतसंस्था या पुढे गेल्या नाहीत.या संघटनात क्षमता नक्की आहे पण ती आपसातील संघर्षासाठी न वापरता विधायक कार्यासाठी लावण्याकरिता सर्व शिक्षकांनी आपापल्या संघटनेवर दबाव आणून त्यांचा कृती कार्यक्रम व शैक्षणिक धोरण विचारायला हवे व यावर चर्चा व्हायला हवी.फक्त वर्गणी व सहली साठी अधिवेशने ही संकल्पना बदलणे काळाची गरज.संघटनानी काळानुसार बदल करणे कारण काळ कोणासाठी थांबत नाही.
👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨
*अमोल शिंदे*
प्राथमिक शिक्षक
9420453475
🕛🕛🕛🕛🕛🕛🕛
*विचार पटले तर जरूर शेयर करा व शिक्षक संघटनांना शैक्षणिक धोरणात्मक बाबी बद्दल बोलायला प्रवृत्त करा...*

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची.. 🖋अमोल शिंदे🖋...