Thursday, 10 May 2018

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती????
*शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

🖋अमोल शिंदे🖋
9420453475
*बरं नाही खरं*

8 मे रोजी राज्यातील अंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध झाली.या यादीत 3553 शिक्षकांची बदली झाली.शासनाने राबवलेल्या ऑनलाइन पारदर्शी प्रणालीने कोणतेही व्यवहार न होता व कोणत्याही त्रासाविना या बदल्या झाल्याने ग्रामविकास विभागाचे सर्व शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचे स्वागत करत आहेत.10 ते 15 वर्षाने 500 ते 700 किलोमीटर वरून आपल्या जिल्ह्यात बदली मिळण्याचा आनंद वेगळाच असतो. बदल्यांच्या यादीत नावे आली खरी पण या अगोदर यादीत नावे आलेले कोकणातील शिक्षक अजूनही तेथेच अडकून आहेत.तर आताच्या यादीत नावे आली असली तरी 10 टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त राहत असल्याने या शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार नसल्याची भूमिका काही जिल्हा परिषदानी घेतली आहे.तर जागा रिक्त आहेत त्यात आमचा काय दोष? असा शिक्षक प्रश्न करत आहेत.पण एका जिल्ह्याने कार्यमुक्त करायचे एकाने नाही असे न करता राज्यातील सर्वच जिल्ह्यांनी 100 टक्के शिक्षकांना कार्यमुक्त करावे हीच मागणी एकमुखी करायला हवी.कोकणातील शिक्षकांच्या या दुसऱ्या टप्प्यात बदल्या न झाल्याने त्यांच्या मनात अन्यायाची भावना आहे.तसेच सिनियरला डावलून ज्युनियरची बदली झाली असल्याची व बदली मागितले नसताना बदली झाल्याचे मेसेज समाजमाध्यमावर फिरत असल्याने बदलिबाबत चर्चा रंगत आहेत. पण ही बदली प्रक्रिया अत्यन्त चांगली असून जास्तीत जास्त लोक आपापल्या जिल्ह्यात जाण्यासाठी फलदायी ठरली आहे. याबद्दल ग्रामविकास विभागाचे अभिनंदन.ज्यांची बदली झाली नाही त्यांनी निराश होऊ नये येत्या काळात त्यांची ही बदली होईल.थोडा संयम सध्या गरजेचा.बदलीच्या निमित्ताने राज्यातील रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या पदांचा विषय ऐरणीवर आला असून शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक वर्गाला शिक्षक उपलब्ध असणे बंधनकारक असताना,गेली सात वर्षे शिक्षकांची भरती बंद केल्याने हजारो वर्गामध्ये शिक्षकाविना विद्यार्थी शिकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.ही कोंडी फोडायची असेल तर नवीन शैक्षणिक वर्षात सर्व वर्गावर शासकीय नियमानुसार100 टक्के मंजूर शिक्षक पदांची भरती केली पाहिजे.राहिलेल्या आंतरजिल्हा बदल्या ही तात्काळ पुर्णत्वास नेत भविष्यात,जास्तीत जास्त शिक्षक आपापल्या जिल्हा/विभागात नोकरी लागतील अशी व्यवस्था केली पाहिजे.राज्याच्या ग्रामविकास विभागाने अंतर जिल्हा बदलिबाबत एक उत्तम प्रक्रिया राबवली असून लवकरच शिक्षक भरतीबाबत ही असेच प्रभावी पाऊल उचलत शिक्षक भरती व बदली पूर्णत्वास न्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.इतक्या मोठ्याप्रमानावर बदल्या करून ग्रामविकास विभागाने शिक्षकांना सुखद अनुभव दिला आहे.कोकणातील जिल्ह्यांनी तेथील शिक्षकांना कार्यमुक्त करत,शिक्षक भरतीसाठी आग्रही भूमिका घ्यायला हवी.शिक्षकांची अडवणूक करून भरतीचे अधिकार शिक्षकांना नाहीत.यासाठी भरतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा हवा.

*लवकर भरती झाल्यास जिल्हाअंतर्गत बदलीत ही दिलासा शक्य..*
भरती होणार असेल तर समाणिकरणासाठी जिल्हाअंतर्गत बदलीत बदल्या करू नयेत.सर्व रिक्त जागा जिल्हाअंतर्गत बदल्यात खुल्या केल्या तर जिल्ह्यांतर्गत बदलीस सुरू असणारा विरोध पूर्ण कमी होईल.बदल्यानंतर राहिलेल्या रिक्त जागांवर मेरिटनुसार नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापणा द्याव्यात.सध्या परजिल्ह्यात नोकरी करून आलेले व नुकतेच 10 वर्षे पूर्ण झालेले तसेच जिल्ह्यात नुकतीच 10 वर्षे सेवा पूर्ण होत आहे असे ज्युनियर शिक्षक जिल्हाअंतर्गत बदलीत गेली सात वर्षे भरती नसल्याने समाणिकरणात अनेक जागा ब्लॉक झाल्याने तालुक्यांच्या बाहेर जाणार व नवीन येणारे लोक समाणिकरणात जागांवर पदस्थापित झाल्यास पुढील दहा वर्षे या वर्षी प्रशासकीय कारणाने बदली झालेला सर्वात सेवा कनिष्ठ शिक्षक परत इच्छित ठिकाणी येण्याची आशा धूसर आहे त्या सर्वांना दिलासा देण्यासाठी जिल्हाअंतर्गत बदली पूर्वी भरती बाबत नेमकी भूमिका शासनाने स्पष्ट केल्यास अनेक बाबीत स्पष्टता येऊन प्रक्रिया अधिक सुलभ होतील.*

राज्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शाळांत व खाजगी अनुदानित शाळात होते.पण गेल्या सात वर्षातील शिक्षक भरती न केल्याचा फटका सर्वाधिक या शाळांनाच बसला आहे.जिल्हा परिषद शाळात शिक्षक भरती राज्यस्तरावरून शासनाकडून केली जाते.सध्या अनेक पदे रिक्त असल्याने यासर्व शाळा अडचणींना तोंड देत आहेत.अनेक डी. एड. व बी.एड झालेले तरुण-तरूणी बेकार आहेत.सरकारी शाळांचा पट काही ठिकाणी कमी झाला याला सर्वात महत्वाचे कारण शिक्षक संख्या कमी असणे व भौतिक सुविधांची कमतरता असणे ही आहेत.पण याकडे दुर्लक्ष करत तात्पुरती मलमपट्टी करत समाणिकरण,कमी पटाच्या शाळा बंद करणे हे अघोरी उपाय केले जात आहेत.ज्याच्यामुळे खेडोपाडी, दुर्गम भागात,विरळ वस्तीत रहाणाऱ्या मुलांचे शिक्षण हिरावेल काय?असा प्रश्न पडतो.तात्पुरती मलम पट्टी करून हा विषय संपणार नाही.पट कमी झाला म्हणून शाळा बंद करण्यापेक्षा तो पट कमी होण्याची कारणे शोधली पाहिजेत.आरटीई ची सोयीनुसार अमलबजावणी न करता 100 टक्के अमलबजावणी गरजेची आहे.सरकारी शिक्षण व्यवस्था हा पाया असून तेथे 100 टक्के शिक्षक पदे भरली गेली पाहिजेत.शिक्षक संघटनांनी ही शिक्षक भरतीसाठी आक्रमक होणे गरजेचे आहे....

भरती केली तर बदल्या कशा होणार??
*गेली काही वर्षे आंतरजिल्हा बदली प्रकरणे निकाली काढायची असल्याने नव्याने भरती केली तर बदल्या होणार नाहीत असे सांगितल्याने शिक्षक संघटना ही याबाबत गप्प आहेत.पण जर राज्यस्तरावरून भरती होणार असेल तर भरती करताना राज्याच्या एकूण पदे व रोष्टर याप्रमाणे भरती केली की पुन्हा जिल्हा देताना रोष्टरचा विचार न केल्यास अनेक समस्या सुटू शकतात.आज प्रत्येक जिल्ह्यात अनुसूचित जमाती(एस.टी.)प्रवर्गातील शिक्षक आहेत ते बहुसंख्य नंदुरबार,पालघर,ठाणे,धुळे या जिल्ह्यातील आहेत अन ते राज्यात सर्व जिल्ह्यात नोकरीस आहेत. या सर्वांना आपापल्या जिल्ह्यात बदली व्हावी वाटते पण जिल्ह्याचे रोष्टर असल्याने हे सर्व लोक आपल्या जिल्ह्यात जाऊ शकत नाहीत.पण हे शिक्षक जर त्यांच्या परिसरात नोकरीस असतील तर स्थानिक भाषा,व तेथील सामाजिक,भौगोलिक परिस्थिती यांची जाण असल्याने ते तेथे अधिक प्रभावी काम करू शकतात. त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत  बदली वेळी जिल्हानिहाय रोष्टर न ठेवता राज्यस्तरावर फक्त भरतीवेळी रोष्टर नुसार भरती करून मेरिट नुसार समुपदेशनाने प्रथम पदस्थापणा व बदली वेळी सेवाज्येष्ठतेनुसार बदली केल्यास अनेक समस्यां सुटतील.*

अमोल शिंदे
*जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली*
9420453475
amol.mallewadi@gmail.com

Monday, 16 April 2018

2017/18 जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमधील संवर्ग 1,2,3 ,TUC व TBR याद्या सांगली

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमधील संवर्ग 1,2,3 ,TUC व TBR याद्या EXCEL FORMAT मध्ये खालील लिंक वर आहे.
संवर्ग 4 मध्ये अर्ज भरणाऱ्या बंधू भगिनींनी या याद्याचा अभ्यास करून 20 पर्याय निवडावेत.
टीम MRJPHS SANGALI

Thursday, 12 April 2018

आधी बदली नंतर समाणिकरण

*आधी बदल्या नंतर समाणिकरण*
🖋अमोल शिंदे✒
9420453475
जे मनातून वाटले ते लिहले आहे..
मनातूनच वाचा संघटना व नेताप्रेम बाजूला ठेवून फक्त एक शिक्षक म्हणून वाचूया...

शिक्षक संघटनांनी बदली विषय घेऊन सातत्याने रान पेटवत ठेवले,सुप्रीम कोर्टा पर्यंत ही संघर्ष केला,*मोठी अधिवेशने घेऊन ग्रामविकास मंत्री पंकजाताईं मुंडे यांनी शासन आदेशात सकारात्मक बदल करण्याचे आश्वासन दिल्याचा डांगोरा पिटला. त्यामुळे नक्कीच काही बाबी बदलतील असे वाटत होते.पण जी स्थिती वर्षांपूर्वी होती तीच आज ही आहे.अजूनही त्रुटी दुरुस्त करणार असल्याचे नेते सांगत आहेत.त्रुटी दुरुस्तीच्या मागण्या पाहिल्या तर त्या त्रुटी कमी करण्याच्या आहेत,की त्रुटी वाढवण्याच्या असा प्रश्न पडतो.* अन पुन्हा एकदा प्रक्रिया सुरू झाल्यावर न्याय, अन्यायाची बाजु मांडून सोशल मीडियावर बदली हवी-नको अशी चर्चा पेटू लागली आहे.

अनेक शिक्षक बांधव फोन करून सर काय तरी करावं लागतं असे म्हणतात.पण खोटी सहानभूती देऊन आपल्याच बांधवाना अल्पकाळाचे समाधान देण्यापेक्षा काही बाबीकडे निरपेक्ष पणे पहावे लागेल.बदली समर्थक अन विरोधक यादोन्हीच्या पुढील निरपेक्ष भूमिका शिक्षक नेत्यांची हवी.पण दुर्दैवाने ते ही दोन गटात विभागले गेले.बदली नको म्हणणारे बदल्या होऊच नयेत या इर्षेने,तर बदली हवी म्हणणारे बदल्या झाल्याच पाहिजेत या जिद्दीने काम करत असल्याने.बदली प्रक्रियेत काही जणांना 100 टक्के दोषपूर्ण, तर काही जणांना 100 टक्के गुणवत्ता पूर्ण दिसत आहे. फक्त काही अगदी किरकोळ बदल केले तरी ही प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकते.पण टोकाचा विरोधाभास व वर्षभर संघटनानी फक्त भेटी गाठी व केलेली प्रचार प्रसिद्धी पहाता गेली वर्षभर अनेक संघटनांनी प्रयत्न केले पण कोणताही भरीव बदल शासन आदेशात का झाला नाही असा प्रश्न पडतो.मुळात शासन आदेशात काय बदल हवा हेच नेमकेपणाने मांडले गेले काय?अनेक आमदार,मंत्री यांच्या भेटी घेऊन निवेदने दिल्याचे,सचिवांना भेटल्याचे फोटो सातत्याने दिसले पण नेमका बदल काय हवा हे मात्र समजलेच नाही.केल्या जाणाऱ्या अनेक मागण्या या फक्त जास्तीत जास्त लोकांची सहानभूती मिळावी अशा लोकप्रिय व ढोबळ मागण्या होत्या.त्यात नेमकेपणा नसल्याने 12/9 ने दिलेले लाभ ही गमावले.(शिक्षकांनी सुधारणेच्या मागण्या पाहिल्या तर लक्षात येईल संघटना सुरवातीला पती पत्नी यांचे एकत्रीकरण विना अट करा अशी मागणी करते,अन त्याच वेळी दुसरी मागणी एकल शिक्षकावर अन्याय होऊ नये.,हा गोंधळ नाही तर संघटना *सगळ्यांना खुश करा* या धोरणाची अमलबजावणी करत आहेत.बदल्या शासन करणार त्यामुळे दोष शासनाचा आहे आपण सर्वाना दिलासा देऊ.असे म्हणून भूमिका घेऊन सुधारणा होणार नाहीत.

अशावेळी एखाद्या आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांने मत मांडणे धाडसाचेच होईल.पण तरीही एक सुचवावे वाटते आता *बदली नको हा अट्टहास सोडून आपण आधी बदली करा,नंतर समाणिकरण करा* हा  पर्याय स्विकारल्यास नक्कीच सामान्य क्षेत्रनिहाहाय ज्युनियर शिक्षकांना,आंतरजिल्हा बदली होऊन आलेल्या 10 वर्षे पूर्ण झालेल्या,महानगरपालिका क्षेत्रातून अतिरिक्त होऊन आलेल्या शिक्षकांना कोणाचेही नुकसान न करता दिलासा मिळेल.व याला कोणाचा आक्षेप असेल असे वाटत नाही.नेतृत्वाने सर्वजण स्विकरतील असा पर्याय पुढे आणला पाहिजे.पण नेतृत्व गोंधळले आहे आजही हा शासन आदेश बहुतांश नेत्यांना समजला नाही मग ते कितपत मंत्रीमहोदय व सचिव साहेबाना सुयोग्य बदल सुचवतील याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.(लगेच काहीजण हा बदली समर्थक आहे की विरोधक याचा डोक्यात खेळ मांडतील पण कृपया त्या नजरेने न पाहता वास्तववादी दृष्टीकोनाने पहा)

बदली प्रक्रियेची अमलबजावणी करताना बदली नको म्हणून भूमिका घेण्यापेक्षा माझी भूमिका

🔴 *मे 2018 पूर्वी सर्व आंतरजिल्हा प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.*

🔵 *तसेच राज्यातील 100 टक्के रिक्त पदे येत्या दोन महिन्यात भरण्यात यावीत यामुळे 100 टक्के वर्गाना जून महिन्यात शिक्षक मिळतील व ते पुढील किमान 3 वर्ष स्थिर असतील अन त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल.समाणिकरण जीच्याबद्दल शासन आदेश आल्यापासून मी सातत्याने सांगतोय जी सर्वात कठीण बाब या आदेशात आहे ती संपेल. सर्व वर्गाना  शिक्षक मिळतील विद्यार्थी व सामान्यांच्या शाळांना शिक्षकाविना रहावे लागणार नाही.*

सरकारचा वेग पहाता भरती होईल असे वाटत नाही.आशा परिस्थितीत समाणिकरण नको, अशी भूमिका घेणे म्हणजे जत सारख्या तालुक्यातील शाळा मोठ्याप्रमाणात शिक्षकाविना रहातील.हा दोष सरकारचा आहे.पण एकीकडे जास्त जागा रिक्त न रहाव्यात विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून समतोल साधण्यासाठी समाणिकरण ही तात्पुरती उपाययोजना करता येईल पण 100 टक्के पदे भरणे RTE नुसार बंधनकारक असून सरकारने त्याची अमलबजावणी करायला हवी.समाणिकरण ही तात्पुरती व्यवस्था म्हणून करताना काहीच झालं नाही तर किमान खालील बदल केल्यास बऱ्याच अंशी दिलासा मिळेल-

सध्या बदली मागताना संवर्ग 4 ला सर्व रिक्त पदावर(समाणिकरणला राखीव न ठेवता)बदली मागण्याचा अधिकार द्यावा.व बदली प्रक्रिया पूर्ण करावी.यामुळे बहुतांश शिक्षकांच्या सोयीच्या बदल्या होतील.बदली झाल्यानन्तर  मगच या शासन आदेशातील समाणिकरण अमलबजावणी करावी.समाणिकरनातून बदली होणाऱ्या शिक्षकाची जागा रिक्तच ठेवून त्या शाळेवर पुन्हा बदली मिळण्याचा अधिकार त्यांना द्यावा.निश्चित पुढील सहा महिन्याच्या कालावधीत नवीन शिक्षक भरती करावी.अन समाणिकरण बदली साठी गेलेल्या शिक्षकांना परत त्यांच्या मूळ जागेवर बदली देण्यात यावी,समाणिकरण साठी बदली झालेल्या शिक्षकांच्या मूळ जागेवर नवीन शिक्षक न देता.नव्या शिक्षकांना या रिक्त जागेवर नेमणूक दिल्यास शिक्षकास पुन्हा आपल्या शाळेत बदली घेता येईल.

जिल्ह्यात भरपूर जागा रिक्त आहेत एकाच तालुक्यात त्या राहून तेथील विद्यार्थ्याचे नुकसान नको यासाठी समानिकरण केले जाणार.पण आज मिरज मधून एखादे ज्येष्ठ शिक्षक जतला समाणिकरनसाठी बदली होऊन गेले.समजा जिल्ह्यात सर्व तालुक्यात समान 10 टक्के जागा रिक्त राहिल्या.पुढील वर्षी नवीन शिक्षक भरती झाली 100 टक्के पदे भरताना सगळी पदे भरली जाणार त्यावेळी सर्वच तालुक्यात नवीन शिक्षक दिले जातील पण जे समानीकरणात फक्त विद्यार्थ्याच्या हितासाठी स्वतःच्या तालुक्यातून बाहेर गेले ते मात्र परत तेथेच अडकून राहून त्यांचा परतीचा प्रवास कठीण होतो अन त्यामुळे या बदल्याना विरोध होतोय तो वरील उपाय आधी बदली नंतर समाणिकरण आमलात आणल्यास बराच विरोध कमी होईल.ज्युनियर शिक्षकांना समाणिकरण मुळे पदे गोठवल्याने शाळा मागायला जागाच नाही,त्यामुळे सर्व रिक्तपदे दाखवावीत.

माझी सन्माननीय ग्रामविकास सचिव असीम गुप्ता साहेब यांना विंनती आहे जर आपणास विद्यार्थी हितासाठी समाणिकरण करायचे आहे तर आपण ज्या जागा समानिकरणाच्या बदली साठी रिक्त ठेवणार आहोत त्या जागा रिक्त करण्यासाठी तेथील शिक्षकाची बदली दुसऱ्या तालुक्यात करण्याची अथवा शाळेवर करण्याची वेळ आली तर सदर शिक्षक आहे त्या शाळेवरच ठेवून त्याचे तात्पुरते कामगिरी आदेश समानीकरणाने द्यायच्या शाळेवर काढावेत.अन नवीन शिक्षक उपलब्ध होताच आशा समानिकरणातून प्राधान्याने भरलेल्या शाळेवर द्यावा व संबंधीत शिक्षकास पुन्हा त्यांच्या मूळ शाळेवर पदस्थापित करण्याची तरतूद करन्यात यावी.हे न करता जर शिक्षक भरती न झाल्याने निर्माण झालेल्या असमतोलासाठी काही ठराविक  शिक्षकाना फटका बसला तर नेहमीच ते अस्वस्थ रहातील.

12/9 रद्द झाल्याने नुकतेच बदलीपात्र झालेले आमच्यातील युवा बांधवाना खो मिळनार आहे.12/9 मुळे युवा शिक्षकांना मिळालेला थोडासा दिलासा मिळालेला पण तो टिकला नाही.  मुळात बदल्या व्हाव्यात,न व्हाव्यात,27/2चा जि आर योग्य अयोग्य,न्यायालयात गेल्याने फायदा झाला तोटा झाला,याबाबत मी मत मांडत नाही कारण गेली वर्षभर याबाबत अनेक तज्ञांनी उहापोह केला आहे. *फक्त जर बदल्या करताना समाणिकरण बाबत वरील बाबी केल्यास नक्किच काही अंशी दिलासा मिळेल.व बदली सुलभ होईल*

आपला
*🖋अमोल शिंदे✒*
सहाय्यक शिक्षक
जिल्हा परिषद शाळा गायकवाड चव्हाण मळा आरग
(हे माझे वैयक्तीक मत असून संघटनची भूमिका नाही)

आपली मतं ही जरूर सांगा

Wednesday, 14 March 2018

पार्टी कोणतीही असो विजयी मात्र भारतीय जनताच होते

अति आत्मविश्वास ...

आज लागलेल्या उत्तर प्रदेश मधील पोट निवडणुकीच्या निकलानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अति आत्मविश्वासामुळे पराभव झाल्याचे मान्य केले.स्वतः योगीजी गेली 27 वर्षे ज्या मतदारसंघातून खासदार आहेत त्याच मतदार संघात स्वतः ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या उमेदवाराचा पराभव होणे हा उत्तर प्रदेश च्या जनतेने भारतीय जनतेला कोणत्याही पार्टीने गृहीत धरू नये असाच इशारा देणारा मानावा लागेल*. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर तेथून सलग पाच वेळा लोकसभेमध्ये निवडून आले होते. तर फुलपूर मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य निवडून आले होते. या दोन्ही जागा आजच्या पोटनिवडणुकीत देशात व राज्यात एकहाती सत्ता असतानाही गमावणे नक्कीच विचार करायला लावणारे....

यातून राजकीय संदर्भ अथवा इतर बाबीत न जाता प्रत्येकाला पाय जमिनीवर हवेत असा संदेश मिळतो.मग अगदी आपल्या विविध संघटना अथवा नेत्यांनीही मी म्हणजे सर्व काही किंवा आमची सत्ता म्हणजे आम्हाला सर्व मान्यता असून हम करेसो कायदा ही ताठर भूमिका सर्वकाळ टिकत नाही. जनतेमध्ये झिरोला हिरो व हिरोला झिरो करण्याची ताकत आहे व योग्य वेळी भारतीय जनता ती वापरतेच...

#भारतीय जनताच नेहमी विजयी होते.

Tuesday, 27 February 2018

Ccrt प्रशिक्षण उदयपूर मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेले नृत्य


CCRT प्रशिक्षण उदयपूर येथे आज मराठी भाषा दिनादिवशी सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राच्या वतीने सांगली टीमने काठीने घोंगडे घेऊद्या की रे...गीत   रमेश मगदूम,आकाश जाधव,अमोल शिंदे,मिलन नागणे,राजकुमार भोसले,अनिल मोहिते यांनी सादर केले.
 https://youtu.be/uJZQdGpzRRo

Thursday, 22 February 2018

*महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात?पण राजस्थानातील नाही???

*महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात?पण राजस्थानातील नाही???
*मार्बलच्या कारखान्यास भेटीतुन जाणवलेली राजस्थानी माणसाची सकारात्मकता...*

राजस्थानातील उद्योगप्रिय लोकांनी पाणी नाही,वाळवंट आहे,कसदार जमिनी नाहीत म्हणून नकारात्मक विचार करत आपल्या न्यूनतेला मोठे करत बसण्यापेक्षा आपल्या जमेच्या बाजूना सक्षम करत जीवनमान उंचावल्याचे लक्षात येते. ज्या मारवाडात वाळवंट आहे तेथील मारवाडी लोक आज देशभरात उद्योग व्यवसायात आघाडीत असून अत्यन्त विपरीत परिस्थिती असतानाही आर्थिक दृष्ट्या सक्षम असून अत्यन्त विश्वासाहार्य व्यावसायिक लोक म्हणून आपली ओळख निर्माण केली.आज आईस्क्रीम असो की हार्डवेअर दुकान,कलाकुसर या सर्व बाबतीत या लोकांनी मिळवलेल्या व्यावसायिक प्राविण्यातून बाजारपेठ आत्मसात केली.आज शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात पण राजस्थानात इतकी विपरीत परिस्थिती असताना शेतकरी आत्महत्या झाल्याच दिसत नाही.

राजस्थान म्हणजे वाळवंट.एवढेच मनावर बिंबले होते.पण एका बाजूला वाळवंट अन दुसरीकडे अत्यन्त आकर्षक दगडांचे डोंगर ही आहेत.जोधपूर मधील जोधपूरी दगड अत्यन्त आकर्षक असून सर्व महाल व घरे याच दगडाने बांधली आहेत.या दगडांची घडवणं अत्यन्त सुरेख असून घराला ही महाल बनवणारा दगड तेथील डोंगरात मुबलक मिळतो.

आपल्याकडे मार्बल पाहिल्यावर तो दगड कुठे असेल व त्यापासून फरशी कशी बनवतात असे वाटायचे.अन आपल्या कडील कठीण काळा दगड पाहिल्यावर जमिनीतून इतका पांढरा शुभ्र दगड निघत असेल??असा प्रश्न पडायचा.राजसमंद जिल्ह्यात मार्बल चे डोंगर आहेत.जोधपूर हुन नाथद्वारा कडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा मार्बलचे कारखाने दिसले.एका कारखान्याला भेट देऊन तेथील माहिती घेतली. तेथे जवळच्या डोंगरातून कापून आणलेले मोठे आयताकृती दगड कटिंग करून त्यापासून विविध आकारात फरशी बनवण्यासाठी दगड मशिनला लावले होते.एका मशीनवर दिवसात दोन दगड कटिंग होतात असे मॅनेजरनी सांगितले.ऑस्ट्रेलिया मधूनही तेथील दगड येथे आला होता व त्याचे कटिंग ही सुरू होते.फक्त आपल्या स्थानिक डोंगरात मिळतो तेच मार्बल तयार करून न पाठवता परदेशातून ही दगड आणून ते मार्बल ही उपलब्ध करणे हे या लोकांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाची जाणीव करून देते.खाणीत दगड काढणारे,ते कटिंग करणारे,गाड्याभरणारे,त्या गाड्या रिकाम्या करणारे तसेच महाराष्ट्रात हे मार्बल विकणारे दुकानदार अन घरात हे मार्बल बसवनारे गंवडी ही राजस्थानी लोकच बहुसंख्येने आढळतात.आपल्याकडील हार्डवेअर दुकाने पाहिली तरी लक्षात येईल मोठी उलाढाल असणाऱ्या राजस्थानी व्यक्तीच्या दुकानात फक्त 2 ते 3 लोक काम करतात.ते राजस्थानी असतात.जेव्हा एखादी गाडी भरायची असते व कामगार कमी असतो त्यावेळी कामगारांची वाट न पाहता स्वतः लोखंडी अँगल उचलून दुकानाचे मालक गाडीत भरतात.पण आपण आपण मालक झालोत की मी फक्त खुर्चीवर बसणार इतर कामे कामगारांनी करायची ही मानसिकता बऱ्याच लोकांत दिसते पण राजस्थानी लोक याबाबतीत अपवाद दिसतात.

*उत्पादन ते होलसेल,रिटेल विक्री अशी या लोकांनी निर्माण केलेली साखळी खूपच मार्गदर्षक आहे.सध्या भारतात उपभोग वृत्ती वाढलेली आहे.भारतात सेवा क्षेत्राची झपाट्याने वाढ होत असताना आपल्या बाजारपेठेचा वापर चीन सारखे देश करत आहेत.भारत हा युवकांचा देश,हे युवक निर्माते बनले तर भारत जगात आघाडीवर असेल पण हे युवक फक्त ग्राहक व नोकरदार बनणे नक्कीच देशाला पिछाडीवर नेणारे होईल.राजस्थानी लोकांनी निर्माण केलेली साखळी सर्वत्र निर्माण झाली



तर नक्कीच नोकरी पेक्षा व्यवसाय,उद्योगात आपण पुढे जाऊ.महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड कष्टाळू आहेत.काळ्या मातीतून ते सोने पिकवतात पण पिकवल्यांनंतर पुढे ते विकण्याची शेतकऱ्याची स्वतःची साखळी मात्र दुर्दैवाने निर्माण करण्यात अपयश आले किंवा ती बनवण्याकडे महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांनी तितके लक्ष दिले नाही.सहकारातून काही अंशी तो प्रयत्न झाला पण सहकारावर वैयक्तिक प्रभुत्व निर्माण करत स्वतःची जहागिरी निर्माण करण्याच्या हव्यासात शेतकऱ्याचा बळी गेला.अन आज शेतकरी आत्महत्येमागे सर्वात मोठे कारण उत्पादन कमी हे नाही तर आलेल्या उत्पादनास, उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव न मिळणे हे असून जर राजस्थान प्रमाणे उत्पादन ते विक्री ही साखळी निर्माण झाल्यास ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी संपन्न व स्वयंभू होईल.पण हे व्हावे अशी प्रबळ इच्छा राज्यकर्त्यांची आहे का???*

अमोल शिंदे
amol.mallewadi@gmail.com
9420453475
http://amolshindemrjphs.blogspot.in/?m=1

Monday, 19 February 2018

*शिवजयंती महाराणा प्रतापांच्या मेवाड भूमीत*

*शिवजयंती महाराणा प्रतापांच्या मेवाड भूमीत*

हिंदवी स्वराज्य संस्थापक,रयतेच्या राजांस विनम्र अभिवादन,जय शिवाजी,जय भवानी

राजे अनेक झाले पण रयतेच्या सुखासाठी झटणारे काही मोजकेच राजे झाले,त्यातही परकीयांची गुलामी झुगा
रून रयतेच्या स्वराज्यासाठी बलशाली परकीय सत्ताधिशांसोबत लढण्याचे सामर्थ्य दाखवणारे व मावळ्यांच्यात स्वराज्याची भावना निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापणा करणारे, मराठी माणसाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज एक युगपुरुष,शिवाजी महाराजांची जयंती स्वराज्यासाठी लढणारे दुसरे राजे महाराणा प्रतापांच्या मेवाड राज्याची राजधानी उदयपूर (राजस्थान) येथे सर्व भारतातून CCRT प्रशिक्षणास आलेल्या देशभरातील शिक्षकांनी उत्साहात साजरी करून Our Cultural Diversity या प्रशिक्षणाच्या विषयाची पहिल्या दिवशीच सुरवात महाराजांच्या जयजयकारांच्या घोषणांनी झाली.त्याचा भाग असणे हा एक आम्हासर्वासाठी अविस्मरणीय क्षण.

छत्रपतींचे नाव घेतले की देशभरातील लोकांच्या डोळ्यात एक आदरयुक्त भाव दिसतो, आज उदयपूर मध्ये छत्रपतींच्या जयजयकारांच्या घोषणा देताना अभिमान तर होताच पण मराठी भूमीत शिवरायांच्या स्वराज्यात जन्माला येणे हे भाग्य लाभल्याची जाणीव होते.

गेली चार दिवस राजस्थान मधील जयपूर, अजमेर,पुष्कर,जोधपूर पहाताना येथील शिवकालीन राजे जयपूरचे मिर्झा राजे जयसिंग,जोधपूरचे जसवन्तसिंह राठोड यांचे राजवाडे,किल्ले आजही अत्यन्त दिमाखात उभे आहेत.तेथे कुठेच मोडतोड झाली नाही.त्या राजांचे वैभव आजही जाणवते.खूपच चैन विलासात या राजांनी आपले जीवन जगल्याची अनेक प्रतीके येथे दिसतात.अन मनात एक प्रश्न पडला शिवकालीन हे सर्व राजे पण यांच्या सर्व बाबी अत्यन्त सुस्थितीत पण महाराष्ट्रातील किल्ले गड तितके सुस्थितीत नाहीत त्यांची पडझड इतकी कशी झाली? राजानी आपले वैभव स्वतःचे गड,राजमाल यांच्या भव्यतेला मानले नाही तर येथील रयतेच्या झोपडीत आंनदाची लकेर निर्माण होऊन समतेने जगता यावे यासाठी अखंड आयुष्य सन्ह्याद्रीच्या कड्यापकारीत जुलमी राजवटी सोबत  संघर्ष करण्यात वेचले.या संघर्षात मुघल व परकीयांनी वेळोवेळी लोककल्याणकारी स्वराज्यात हैदोस करत येथील गड,किल्ले,मंदिरे यांची मोडतोड केली.पण जयपूर व जोधपूरचे राजे पराक्रमी व वैभव संपन्न होते पण ते मुघलांच्या आधीन झाले व त्यांनी आपल्या दौलती वाचवल्या.मिर्जा राजे जयसिंग तर औरंगजेबचा सेनापती व जोधपूरचे जसवन्तसिंह राठोड सरदार होते.आग्रा भेटीत जसवन्तसिंह राजांच्या पुढल्या रांगेत का होता?याचे कारण पराक्रम नव्हता तर त्यांची मुघलांसोबत असणारी वफादारी..पण जेव्हा हाल्दीघाटी व चित्तोडगड मध्ये गेलो त्यावेळी तेथील अनेक बाबी भग्न स्वरूपात जाणवल्या अन जे राजे परकीयांच्या अंकित झाले नाहीत व रयतेच्या भल्यासाठी उभे राहिले त्यांच्या राज्यातील ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड संघर्षात झाली.चित्तोडगड हा अशाच स्वाभिमानी संघर्षाची प्रचिती देणारा गड,राणी पद्मिनी सोबत हजारो स्त्रियांनी केलेला जोहर असो की महाराणा प्रताप ज्यांनी 21 वर्षे कोणताही थाटमाट न करता पानावर भोजन घेतले व जमिनीवर विश्रांती घेतली,आयुष्यभर मुघलांसोबत गनिमी काव्याने संघर्ष केला.दुर्दैव हेच की एकीकडे महाराणा प्रताप स्वराज्य स्वाभिमानासाठी लढत असताना इतर राजे मात्र मुघलांना सामील होऊन स्वतः ऐशोअरामात राहिले. *जोधपूर,जयपूर पहाताना स्थापत्य कला,महालांची भव्यता आवडली पण इतिहास ऐकताना रयतेसाठी संघर्ष जाणवत नव्हता पण हाल्दीघाटी, चित्तोडगड पहाताना तेथील राजांचा पराक्रम,शौर्य स्वातंत्र्यप्रियता प्रेरणा देणारे होते.छत्रपती शिवाजी महाराजानी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य व मेवाडचे राज्य यांच्यात साम्य जाणवले,आज याच मेवाड मध्ये छत्रपतींची जयंती सर्वानी मोठ्या उत्साहाने साजरी केली.*

*यावेळी सांगलीतून उपक्रमशील शिक्षक राजकुमार भोसले, मिलन नागणे,रमेश मगदूम,अनिल मोहिते व आकाश जाधव यांच्या सोबतीने इतिहासाच्या पाउलखुणा पाहत आपली सांस्कृतिक विविधता या विषयाचे देशभरातील शिक्षकांसोबतच्या प्रशिक्षणाची सुरवात उत्साहात झाली...*

CCRT प्रशिक्षणाच्या निमित्ताने देशभरातील शिक्षकांशी हितगुज करण्याची व त्यांच्या शिक्षण पद्धती,कला,संस्कृती यांची माहिती जाणून घेता येणार आहे.

✒✒ *अमोल शिंदे* ✒✒
*जिल्हा परिषद शाळा गायकवाड चव्हाण मळा आरग,ता.मिरज जि. सांगली*

9420453475

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची.. 🖋अमोल शिंदे🖋...