Tuesday, 23 January 2018

जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी नाही तर राज्य सरकारी कर्मचाऱ्या चा हक्क आहे

*जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी नाही तर राज्य सरकारी कर्मचाऱ्या चा हक्क आहे*

सध्या एक पत्र सोशल मीडिया वर फिरत असून आर्थिक बोजा शासनावर पडत असल्याने जुनी पेन्शन देता येणार नसल्याचे या पत्रात सांगितले आहे.पण आशा पत्राने जुनी पेन्शन लढा थांबणार नाही तर तो अधिक तीव्र होईल.लोकशाहीत लोकमताने सरकार बदलू शकते तसे सरकारचे मतही.पण आपण मागत असलेली मागणी योग्य आहे का?असेल तर ती कशी?या लढ्यात गेली 4 वर्षे सक्रिय असून अजूनही लढणाऱ्याना व शासनात बसलेल्याना नेमके आम्ही जुनी पेन्शन का मागतोय हे समजले नाही असे वाटत असल्याने मी का जुनी पेन्शन मागतोय ते लिहत आहे.तुम्हाला काय वाटते याबाबत हे जाणायला आवडेल.जुनी पेन्शन आपला हक्क कसा हे समजून घेण्यासाठी खालील लेख पूर्ण वाचा अन coment box मध्ये आपली मते मांडा.

*एकच मिशन जुनी पेन्शन ची टोपी काय मागत आहे?*

गेल्या दोन तीन वर्षांत राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी आक्रमक पणे करत आहेत.यासाठी विविध स्तरावर आंदोलने सुरू आहेत.जुनी पेन्शन योजना म्हणजे 1982 ची नागरी पेन्शन योजना.ही जुनी योजना केंद्र शासनाने बंद करत 1 जानेवारी 2004 पासून सेवेत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)अंमलात आणली.केंद्राचे अनुकरण करत राज्यांनी पुढे तशीच योजना राज्यसरकारी कर्मचाऱ्याना लागू करण्याचे निर्णय घेतले.महाराष्ट्रात तत्कालीन सरकारने 1 नोव्हेंबर 2005 हा मुहूर्त राज्यात जुनी पेन्शन रद्द करून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अमलबजावणी साठी शोधला.अन 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या राज्यसरकारी कर्मचाऱ्याना नवीन योजना लागू झाली.नवीन पेन्शन योजना आणताना पेन्शन योजनेचे ध्येय याबाबत सर्वोच्च न्यायालयाने डी. एस.नकारा विरुद्ध भारत सरकार या प्रकरणी दिलेल्या निवाड्यात दिलेले खालील अभिप्राय पहाणे महत्वाचे.
 1.कर्मचाऱ्याना दिले जाणारे निवृत्ती वेतन बक्षीस किंवा दानशूरता म्हणून मालक देत नाही.उलटपक्षी निवृत्तिवेतन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे.
2.निवृत्तीवेतन हे अनुग्रहपूर्वक दिलेलीे रक्कम  नसून केलेल्या सेवेबद्दलचे प्रदान आहे.
3.सामाजिक सुरक्षितता म्हणून कर्मचाऱ्याने वृद्धावस्थेत सन्मानाने व योग्यरित्या आयुष्य व्यथित करावे या उद्देशाने निवृत्ती वेतन दिले जाते.
सर्वोच्च न्यायालयाने वर रेखाटलेली भूमिका पाहिल्यास नवीन आणलेली अंशदान निवृत्ती वेतन योजना वरील ध्येय गाठण्यात ती 12 वर्षांनी यशस्वी होताना दिसत आहे काय?व जर नसेल तर त्याबाबत तात्काळ निर्णय घेत वरील ध्येय साध्य करणारी योजना लागू करणे सरकारचे कर्तव्य आहे.

मुळात जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यास त्याच्या निवृत्तीच्या वेळच्या पगाराच्या शेवटच्या 10 महिन्यांच्या पगाराच्या सरासरीच्या 50 टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळत व त्यामध्ये वाढणाऱ्या महागाई नुसार वाढ होत जात. तसेच कर्मचाऱ्याचा मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन मिळत.कर्मचाऱ्यास मिळणारे निवृत्ती वेतन निश्चित होते त्यात अनिश्चितता नव्हती.तसेच हे निवृत्ती वेतन देण्यासाठी त्याच्या सेवाकालातील पगारातून कोणत्याही प्रकारची रक्कम कपात पेन्शनसाठी केली जात नसत.

पण 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत येणाऱ्या राज्यसरकारी कर्मचाऱ्यांसाठी अस्तित्वात आलेल्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेत निवृत्तीनंतर मिळणारे निवृत्ती वेतन अनिश्चित आहे.ही योजना मार्केट मधील गुंतवणुकीवर आधारित आहे.मार्केटच्या चढउताराचा निवृत्ती वेतनावर परिणाम होणार आहे.तसेच या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्याच्या अकस्मिक मृत्यूनंतर द्यायच्या लाभाबद्दल स्पष्टता नाही.त्यामुळे आज राज्यात कर्मचाऱ्याच्या अकाली अकस्मिक मृत्यूनंतर त्या कर्मचाऱ्यांस कसलाच लाभ दिला नसल्याचे व सदर कुटुंबे खूपच आर्थिक अडचणीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

*नवीन योजनेचे स्वरूप कशी व किती मिळणार पेन्शन*
या नवीन पेन्शन योजनेनुसार निवृत्ती वेतन देण्यासाठी कर्मचाऱ्याच्या सेवाकालातील पगारातून दरमहा 10 टक्के रक्कम कपात जाते.तितकाच सममूल्य शासनहिस्सा दिला जाईल व ती रक्कम शासनाने नियुक्त केलेल्या फंड मॅनेजर कंपन्या बाजारात गुंतवतील व सदर गुंतवणुकीतून सेवानिवृत्ती वेळी जमा होणाऱ्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांस दिली जाईल व 40 टक्के रक्कम सरकार जमा ठेवून त्यावर मिळणारे व्याज व गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभावर आधारित निवृत्ती वेतन दिले जाईल असे ढोबळ स्वरूप या नवीन योजनेचे आहे.निवृत्ती वेळी एक पेन्शन ठरल्यानंतर त्यात महागाईनुसार वाढ होणार नाही.

ही योजना महाराष्ट्र सरकारने 1 नोव्हेंबर 2005 पासून लागू केली आहे.पण आज अखेर राज्यातील शिक्षकांना गेल्या 12 वर्षात एकदाही सममूल्य शासन हिस्सा व व्याज दिले नाही व कर्मचाऱ्यांच्या पगारातून केलेली रक्कम ही मार्केट मध्ये गुंतवली नाही.केंद्राच्या धरतीवर योजना अंमलात आणली पण तिच्या अमलबजावणीकडे लक्ष देण्यात आले नाही.त्यामुळे  1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या कर्मचाऱ्याचे भविष्य असुरक्षित झाले आहे.12 वर्षे याबाबत ठोस धोरण नसल्याने राज्य सरकारी कर्मचारी हवालदिल होऊन जुनी पेन्शनच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे.

*राज्याने फक्त आदेश काढले अमलबजावनीकडे दुर्लक्ष*
1 जानेवारी 2004 ते 1 नोव्हेंबर 2005 म्हणजे केंद्र शासनानंतर 1 वर्षे 10 महिन्यानी ही योजना महाराष्ट्र सरकारने स्वीकारली.आजही अनेकजण ही योजना बदलणे केंद्र सरकारच्या अधिकारातील विषय आहे असे सांगतात,पण वरील बाबी वरून राज्यसरकारला ही योजना नाकारण्याचा व जुनी पेन्शन चालू ठेवण्याचा अधिकार आहे हे स्पष्ट होते.केंद्रानंतर जवळपास पाऊणे दोन वर्षांनी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला.हा काळ या नवीन योजनेचा अभ्यास व अमलबजावणी प्रक्रिया याचा अभ्यास यासाठी लागला असावा. त्यानंतर राज्याने ही योजना तयारीनिशी स्वीकारली असावी असे वाटते.पण आज 12 वर्षानंतर या योजनेच्या अमलबजावणी मधील गोंधळ पहाता राज्यशासनाने विना अभ्यास व तयारी न करता केंद्राची कॉपी केली पण जेव्हा प्रत्यक्ष अमलबजावणीची वेळ आली तेंव्हा मात्र नापास व्हावे लागले असेच दिसत आहे.त्यासाठी गेल्या 12 वर्षातील काही महत्वाचे शासन आदेश पाहिल्यास स्पष्टता येईल.

31 ऑक्टोबरला 1 अध्यादेश काढत 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्याना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली.पण या योजनेची अमलबजावणी व कार्यपद्धती बाबतचा सविस्तर शासन आदेश 21 मे 2010 ला काढण्यात आला.म्हणजे योजना लागू 2005 ला केली व तिची कार्यपद्धती 2010 ला पाच वर्षांनंतर?खरेतर नवीन योजना मार्केट आधारित असल्याने पहिल्या महिन्यापासून तिची अमलबजावणी होणे आवश्यक होते.शासन अध्यादेश आल्यानन्तर लगेचच कार्यपद्धती निश्चित करून अमलबजावणी होणे गरजेचे पण कार्यपद्धतीचा आदेश काढायला पाच वर्षे लागली.

दरम्यानच्या काळात अनेक शासन आदेश येत पण शिक्षक कर्मचारी वगळून हे आदेश यायचे.अखेर 29 नोव्हेंबर 2010 ला शिक्षकांच्या बाबतीत या योजनेची कार्यपद्धती सांगणारा शासन आदेश आला.पाच वर्षांनंतर आदेश आल्यानन्तर तरी अमलबजावणी होणे गरजेचे होते पण या आदेशानंतर फक्त पगारातून कपाती सुरू करण्याची अमलबजावणी करण्यात आली व शासन आदेशात सांगितलेल्या इतर कोणत्याच बाबीची अमलबजावणी झाली नाही.शिक्षकांच्या कपाती झाल्या पण सदर कपात केलेली रक्कम जमा करण्यासाठी लेखाशीर्ष देण्यासाठी पुढे पाच वर्षे गेली.आज ही राज्यात अंशदान पेन्शन अंतर्गत किती शिक्षक येतात?त्यांची आजपर्यंत किती रक्कम कपात करण्यात आली याची अचूक आकडेवारी उपलब्ध नाही.नुकतेच 13 नोव्हेंबर 2017 ला शिक्षण उपसंचालक,शिक्षण संचलनालय पुणे यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्याना पत्र काढून याबाबत माहिती सादर करण्यास सांगितले आहे.योजना आणून 12 वर्षे झाली तरी फक्त टोलवा टोलवी सुरू आहे.शिक्षकांना त्यांच्या कपातीचा हिशेब सुद्धा देण्यात आला नाही तर अनेकांची DCPS खाती न काढता कपाती करण्यात आल्या.

सुरवातीच्या 10 वर्षात फक्त कपात सोडून काहीच अमलबजावणी झाली नाही.फ़ंड मॅनेजर नाही,शासन हिस्सा नाही,व्याज नाही अन कापलेली रक्कम ज्या कारणासाठी घेतली त्यासाठी गुंतवणूक नाही.दरम्यानच्या काळात काही शिक्षक मृत झाले तर त्यांना नेमका परतावा काय द्यावा व त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना देण्याबाबत आजही निर्णय नाही.राज्याने केंद्राने या योजनेच्या अमलबजावणीसाठी केलेली तयारी मात्र केली नाही.आज या नव्या योजनेमध्ये आवश्यक बदल करत केंद्राने आकस्मिक,अकाली मृत होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन या योजनेत दिले.तसेच सर्व कर्मचाऱ्याना सेवा उपदान( ग्रॅज्युटी ) देण्याचा निर्णय घेतला पण याबाबीकडे महाराष्ट्र सरकारने सोयीस्कर दुर्लक्ष केले. अन शेवटी डिसीपीएस योजना राबवणे जमत नाही हे लक्षात आल्यावर 27 ऑगस्ट 2014 ला शासन आदेश काढून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना(DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय पेन्शन योजना(NPS) मध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला.यावरून महाराष्ट्र शासन या  नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या(DCPS)अमलबजावणीत अपयशी झाल्याचे नव्याने सेवेत आलेल्या कर्मचाऱ्याच्या लक्षात येऊ लागले अन 2014 पासूनच जुनी पेन्शन लागू करा या मागणीस बळ येऊ लागले,अन तोपर्यंत या योजनेत येणाऱ्या कर्मचाऱ्याची संख्या ही एकूण कर्मचारी संख्येच्या 33 टक्के झाली होती अन ते संघटित होऊ लागले.अन तेथूनच कर्मचारी संघटनेच्या मागणी मध्ये जुनी पेन्शन लागू करा ही मागणी दिसू लागली.

*DCPS योजना NPS मध्ये विलीन झाल्यावर काय होणार?*
NPS मध्ये जाण्यास ही कर्मचारी विरोध करत आहेत.याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या 12 वर्षात राज्यसरकारी कर्मचाऱ्याची या योजनेसाठी कपात करण्यात आलेली 1 रुपया ही रक्कम बाजारात गुंतवली गेली नाही.ज्यादिवशी कर्मचारी NPS मध्ये जाईल तेंव्हा पासून NPS द्वारा ती गुंतवली जाईल अन तेथून पुढे NPS नुसार लाभ मिळतील.पण गेल्या 12 वर्षात गुंतवणुक शासकीय धोरणाच्या अमलबजावणी अभावी राहिली पण तिचा फटका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी का सहन करावा?एकाच दिवशी समान पदावर,समान वेतनश्रेणीत सेवेत एक कर्मचारी केंद्र सरकारच्या सेवेत तर दुसरा राज्य सरकारच्या सेवेत आले.दोघेही एकाच दिवशी समान पदावर,समान वेतनश्रेणीत,एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले तर दोघनाही निवृत्त होताना NPS मधून मिळणारी पेन्शन मात्र समान मिळणार नाही.कारण राज्यसरकारी कर्मचारी NPS मध्ये 2017 मध्ये सामील झाला तर केंद्र सरकारी कर्मचारी मात्र सुरवातीपासूनच NPS मध्ये असल्याने त्याची गुंतवणूक वेळेत झाल्याने लाभ अधिक मिळणार.शासनाच्या 12 वर्षे केलेल्या चालढकलीचा फटका मात्र राज्यसरकारी कर्मचाऱ्यास बसनार असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची नागरी पेन्शन देणे हाच पर्याय असून आज पर्यंतच्या केलेल्या सर्व रकमा GPF खात्यावर वर्ग करून या कर्मचाऱ्याचे भविष्य सुरक्षित करावे अशी मागणी पुढे येत आहे.शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत वेळीच सोडवणूक करणे गरजेचे आहे.अन्यथा भविष्यात खूप मोठ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या असंतोषास सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.संपूर्ण देशभर याबाबत असंतोष असून केंद्रीय कर्मचारी ही या योजनेपासून समाधानी नाहीत.

अमोल शिंदे 
जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
मोबाईल-9420453475

Tuesday, 16 January 2018

स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजारोहन कोणी करावे यावरून काहि ठिकाणी प्रश्न निर्माण व्हावेत?

*स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजारोहन कोणी करावे यावरून काहि ठिकाणी प्रश्न निर्माण व्हावेत??*

स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण म्हणजे आंनदाचे दिवस. एकता, समानता,स्वातंत्र्य,बंधुता,मानवता मनामनात रुजवणारे दिवस.पारतंत्र्यातील काळी राजवट अन त्याविरुद्ध  आवाज उठवत स्वातंत्र्यसूर्य उगवण्याकरीता बलिदान देणारे राष्ट्रीय नेते,क्रांतीकारक यांच्या कार्याचे स्मरण करत.उज्वल भारतासाठी आपला खारीचा वाटा उचलण्यास प्रेरित करत,मनामनात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करणारे सण.ते निखळ आंनदाने एकात्म भावाने आपण साजरे करतो.

नुकताच संघटनेच्या वतीने सीईओ साहेबाना भेटायला जाणार होतो अन एका शिक्षक मित्राचा फोन आला अन त्याने विचारलेल्या प्रश्नाने अंतर्मुख व्हायला लावले.तो प्रश्न होता.स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी शाळेमधील ध्वजारोहन कोणी करावे??स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजारोहन कोणी करावे हा प्रश्न निर्माण व्हावा??त्याला काय असत गावातल्या स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक,प्रतिष्ठित नागरिक,पदाधिकारी यांच्यापैकी कोणाच्या तरी हस्ते करायचं असे सांगितल्यावर ते मित्र म्हणाले नाही सर गावात निवडणुका झाल्या आहेत अन नियमाने ध्वजारोहण  कोण करायचे ते सांगा??मी निरुत्तर झालो.कारण असा काही नियम आज पर्यंत आम्ही लावला नव्हता व तसा विचार ही केला नव्हता.सिईओ साहेबाना नेमकी मुख्याध्यापकाची अडचण सांगितली व शासनाकडून त्याबाबत मार्गदर्शन मागवण्याची विंनती केली.भविष्यात ते येईल ही पण देशप्रेमापेक्षा राजकीय अभिनिवेश महत्वाचे ठरुन निर्माण होणारे असे प्रश्न नकीच अंतर्मुख करायला लावणारे आहेत.भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत असे रोज प्रतिज्ञेत जोर जोराने म्हणून ही तिची रुजवणूक मात्र झाली काय?अन झाली तर हा प्रश्न निर्माण झाला नसता..

खरेतर असा प्रश्न निर्माण व्हायला नाही पाहिजे पण बदलत्या काळात निर्माण झालेला असा हा प्रश्न.बहुसंख्य ठिकाणी हा प्रश्न निर्माण होत नाही.गावातील स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक,प्रतिष्ठित नागरिक,पदाधिकारी यांच्यापैकी कोणाच्या तरी हस्ते ध्वजारोहण केले जाते.पण काही ठिकाणी मात्र ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करावे यासाठी चढाओढ होते अन कार्यक्रमाचा मूळ उद्देश बाजूला जात सदर शाळेतील शिक्षकांची ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करायचे या प्रश्नाचे उत्तर देताना गोंधळाची स्थिती होत निष्कारण मानसिक त्रासास व रुसव्या फुगव्याना सामोरे जावे लागत असल्याचे प्रकार काही ठिकाणी होतात.हे वास्तव आहे.खरेतर याबाबत स्पष्ट असे आदेश नाहीत.पण एकंदर बदलत असलेली परिस्थिती,समाजमनाचा विचार करत शाळेतील ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करावे याबाबत काही मार्गदर्शक सूचना निर्गमित होणे शाळेतील मुख्याध्यापकांच्या दृष्टीने गरजेचे आहे.पण हा प्रश्न निर्माण होऊ नये अन लोकशाहीतील या पवित्र सणाच्या दिवशी आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी आपण सर्वजण भारतीय या एका सूत्रात बांधले गेलो पाहिजे.भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत असे प्रार्थनेत म्हणतो.मग राष्ट्रध्वज फडकवणारा भारतीय आहे,तो माझा बांधव आहे एवढी बाब मनात रुजवली तर ध्वजारोहण कोणी करावे??हा प्रश्न निर्माण होणार नाही.अनेक क्रांतिकारकानी रक्ताचे पाट वाहिले,आजही सीमेवर लाखो जवान आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी सीमेवर लढत आहेत.खडा पहारा देत आहेत.या सर्वांना वंदन करताना आपण आपली ओळख विसरून भारतीय म्हणूनच या राष्ट्रीय सणात सामील झालो तर आनन्द द्विगुणित होईलच पण ऐक्याची भावना वृद्धिंगत होत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण निखळ आंनदाने एकात्म भावाने साजरे होतील...

अमोल शिंदे


Sunday, 14 January 2018

फक्त गोड नाही तर ज्या बोलण्यातून गोड परिणाम होईल असे गोड बोलूया

*नुसतं गोड बोलून चालणार काय??*
*फक्त गोड
नाही तर ज्या बोलण्यातून गोड परिणाम होईल असे गोड बोलूया*

*सर्वोच न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन व्यवस्था सदृढ करण्यासाठी मौन सोडले आता किरकोळ बाबीत मौन पाळायचे काय..??*

*आज संक्रात आपण एकमेकाला तिळगुळ घ्या गोड बोला अशा शुभेच्छा देतो. अलीकडे बदलत्या जगात बदलती मानसिकता पाहिली तर आपण गोड नेहमी बोलतोच.अनेकदा तर एखादा चुकीचे वागत आहे हे दिसत असूनही जाऊदे आपल्याला काय करायचे आपल्याला काय फरक पडतो का?मग कशाला वाईटपणा?असा विचार करून आपण सदर विघातक बाबी कडे दुर्लक्ष करून वैयक्तिक हित संबंध जपण्यात धन्यता मानतो.पण वेळीच समाजातील अपप्रवृत्ती बद्दल बोलायला हवे.नुसतं कोणाला वाईट वाटू नये म्हणून,दुसऱ्याला बर वाटावे म्हणून गोड बोलायला नको.तर खरं अन समाज हितासाठी प्रसंगी
कटू बोलावे लागले तरी बोलू,कारण औषध कडू असते पण परिणाम चांगला,काहीवेळेला वर्तमानात कटू वाटणारे शब्द पुढे अनेक समस्याना बांध घालतात अन ते भविष्यात गोड ठरतात.नुकतेच सर्वोच न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या तो प्रयत्न असाच औषधरुपी ठरावा.*

*प्रत्येकजण स्वतःच्या नजरेतून याबाबीकडे पहातोय पण सर्वोच न्यायालयाचे चार ज्येष्ठ न्यायाधीश एकत्र येत जर आपल्या व्यथा मांडत असतील तर याबाबीकडे अत्यन्त गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.याबाबीकडे राजकीय अभिनिवेशातून न पहाता लोकशाहीला मजबूत करणारे पाऊल म्हणून पाहिले पाहिजे.जे चार न्यायाधीश समोर येऊन बोलले त्यातील एकजण येत्या ऑक्टोबर मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत.असे असताना पदापेक्षा कर्तव्याला महत्व देत आपले कर्तव्य बजावण्यात जे अडथळे आहेत ते मांडणे नक्कीच शासकीय व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे असे पाऊल आहे.अनेकदा आपले कर्तव्य बजावताना आपणास ज्या अडचणी येतात त्या सांगणे म्हणजे बंडखोरी किंवा विरोध म्हणून पाहिले जाते.त्यामुळे कळत असूनही अनेकजण गप्प रहातात.*

*पेन्शन बंद करून लाखो कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर शासनाने संक्रात आणली.आता सरकारी शाळा बंद करून गोरगरिबांच्या शिक्षणावर संक्रात आणली जात असताना,
तिळगुळ खाऊन नुसतं गोड न बोलता या तीळगुळातील ऊर्जा आपल्या सर्वांच्या मनामनात संचारो.चुकीच्या धोरणांना विरोध करण्याचे सामर्थ्य सर्वाना मिळो.सामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी कंपनीच्या शाळा नव्हे तर सरकारी शाळा समृद्ध करण्याचा अट्टहास करूया.शिक्षक संघटना आपसी राजकारण व अर्थकारण यातून वर येत शिक्षणाविषयी मंथन करत धोरणात्मक बाबीवर सडेतोड एकमुखी भूमिका घेतील अन सरकारी शाळा समृद्ध व्हाव्यात यासाठी प्रसंगी कटू पण सत्य मांडतील.सर्वाना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा व 23/10 लवकर रद्द व्हावा.यासाठी नुसते पत्रकावर विषय न घेता ते विषय तडीस लावन्यासाठी झटतील.आपला प्रश्न असेल तरच आंदोलनाला हजर,संघटनांच्या नेत्यांना फोन पण धोरणात्मक बाबीवर व शिक्षणाच्या मुद्यावर आपलं मौन सोडत.खऱ्या अर्थाने या संक्रातीच्या निमित्ताने फक्त गोड बोलून नाही तर ज्या बोलण्यातून गोड परिणाम होईल असे गोड बोलावे ह्याच माझ्याकडून व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली टीम कडून शुभेच्छा..तिळगुळ घ्या गोड बोला....*

आपला
अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली*
9420453475

Tuesday, 9 January 2018

शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या गाड्यामध्ये इलेक्ट्रॉनिक काटे कधी येणार??

शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या गाड्यामध्ये इलेक्ट्रॉनिक काटे कधी येणार???

बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर शालेय पोषण आहार तांदूळ व धान्यादी माल वाटप सुरू झाले.शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या गाड्यामध्ये इलेक्ट्रॉनिक काटे असावेत अशी मागणी वेळोवेळी केली.नुकत्याच झालेल्या शिक्षण समिती सभेमध्येही हा विषय मांडला.सर्व सदस्यांनीही इलेक्ट्रॉनिक काटे पुरवठादाराने गाडीत ठेवले पाहिजेत व त्यास सूचना करू असे सांगितले.त्यामुळे यावेळी शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या गाड्यामध्ये इलेक्ट्रॉनिक काटा असेल असे वाटले होते.पण यावेळीही जुन्या ताणकाटा पद्धतीनेच वाटप होत आहे.लवकरच या ताणकाट्याच्या जागी इलेक्ट्रॉनिक काटे येतील अशी आशा आहे. त्यामुळे तांदळाची 50 किलो ची पोती वजन करून घेणे सोपे होईल....

सोबत याबाबत सध्या वजनाच्या पद्धतीचे काही फोटो.

Monday, 1 January 2018

शिक्षणाचे माध्यम : ट्रेंड आणि सत्य

*शिक्षणाचे माध्यम : ट्रेंड आणि सत्य* -
अमोल शिंदे 9429453475

अन्न, वस्त्र,निवारा या मूलभूत गरजांमध्ये कालानुरूप बदल वाढ होत आरोग्य व शिक्षण या दोन गरजांची भर मूलभूत गरजांमध्ये भर पडली.शिक्षण ही आज या सर्वामध्ये महत्वाची गरज निर्माण झाली.महाराष्ट्राचा विचार केल्यास एकीकडे दुर्बल,वंचीत घटकातील मुलं शाळाबाह्य राहू नयेत ते शिक्षणाच्या प्रवाहात यावेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत.तर दुसरीकडे मध्यम,उच्च मध्यम वर्गीय पालक आपल्या मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा याबाबत प्रचंड गोंधळलेला आहे.शाळा हा प्रतिष्ठेचे मानक बनत असून शिकणाऱ्या मुलाचा विचार न करता एक ट्रेंड म्हणून आपल्या मुलांना इंग्रजी शाळात प्रवेश घेण्याचा सपाटा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.खेडोपाडी इंग्रजी शाळा निघत आहेत.त्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना तरी इंग्रजीविषयाचे पुरेपूर ज्ञान आहे का?आशा शुद्ध व्यावसायिक हेतूने सुरू असणाऱ्या शाळात मुलं पाठवली तर त्यांचा सर्वांगीण विकास होईल काय?केजी टू पीजी सर्व शिक्षण इंग्रजीतून शिकले तरच स्पर्धेच्या युगात मुलं टिकेल असा समज पसरवला जातोय तो अयोग्य आहे.

आपल्या मुलाला कशासाठी शिकवायचे?असे विचारल्यास शिक्षणातून चांगले करियर घडावे म्हणून असे उत्तर बहुसंख्य पालक देतात.चांगले करियर म्हणजे काय?असे विचारल्यास चांगल्या पॅकेजची नोकरी मिळायला हवी असे सांगतात.नोकरी म्हणजे करियर असा समज आजही कायम आहे.अन हे करायचे असेल तर सर्व शिक्षण इंग्रजीतून घ्यायला नको काय?म्हणून आम्ही राजुला इंग्रजी शाळेत घातला आहे.किती छान तो इंग्रजी बोलू लागला आहे.आम्हालाही कळत नाही पण फडाफड बोलतोय असे अभिमानाने पालक सांगत असतात.मातापित्यांची मुलांच्या शिक्षणात व त्यांना सुजाण नागरिक घडवण्यात महत्वाची भूमिका असते.मातापित्यानी असे वातावरण निर्माण केले पाहिजे की मुलं मोकळेपणाने प्रश्न विचारू शकेल,उत्तर मिळवू शकेल व त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधू शकेल.पण घरातील संभाषणाची भाषा व शाळेतील शिकण्याची भाषा वेगळी असेल.शाळेतील भाषा घरात सर्वाना परिपूर्ण अवगत नसेल तर त्या शिकणाऱ्या मुलाला पडलेले अनेक प्रश्न अनुत्तरित रहातात व तो शाळा व घर या दोन्ही ठिकाणी मुक्तपणे संवाद साधू शकत नाही.याचा विपरीत परिणाम बालकाच्या सर्जनशीलतेवर होतो.

आपल्याला ज्या प्रकारचा समाज घडवायचा आहे त्याप्रकारचे शिक्षण आपण दिले पाहिजे.इंग्रजानी 1835 मध्ये लॉर्ड मेकॅले यांच्या डोक्यातून आलेली शिक्षणपद्धती भारतात रुजवली.ज्या शिक्षणव्यवस्थेचे ध्येय स्थानिक लोकांची विचारशक्ती वाढू नये असे होते.इंग्रजांना त्यांच्या भाषेत,त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा नोकरवर्ग हवा होता.त्यांचा हा हेतू त्यांनी भाषेच्या व शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केला.इंग्रजी भाषेमुळे इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करणे सोपे झाले म्हणताना इंग्रजी ही त्यांची मातृभाषा होती हे आपण विसरतो.इंग्रजानी कोणत्याही देशावर राज्य करताना स्वतःच्या मातृभाषेचा आधार घेतला.स्वातंत्र्य मिळवून 70 वर्षांनंतर पुन्हा एकदा मेकॅले च्या शिक्षण पद्धतीप्रमाणे इंग्रजी फडाफड बोलणारा पण विचारशक्ती पुरेशा प्रमाणात विकसित न झालेला उच्च शिक्षित नोकरवर्ग तयार करणे हाच उद्देश प्राथमिक शिक्षण मातृभाषेत न घेता परकीय भाषेत घेताना साधला जात नाही काय?

खरे शिक्षण मानवाची प्रतिष्ठा व आत्मसन्मान वृद्धिंगत करते.एकंदरीत शिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र उभारणीच्या क्षमता निर्माण करणे हे असले पाहिजे.याचा विसर पडून तो एक उत्तम नोकर बनवण्यासाठी चाललेली धडपड चिंताजनक आहे.नोकरी शोधणारे बनण्यापेक्षा नोकरी निर्माण करणारे व्हा ही जाणीव त्यांच्यात निर्माण करण्याने सर्जनशीलतेला चालना मिळू शकेल.तसेच हे शिक्षण घेत असताना मुलं नेहमी आंनदी राहिले पाहिजे याची ही दक्षता घेतली पाहिजे.

आज अगदी ग्रामीण भागातही आपल्या पाल्याला इंग्रजीतून शिकवण्याबाबत पालक आग्रही दिसतात. इंग्रजीही संपर्क भाषा आहे.ती उत्तम बोलता यावी,समजावी ही अपेक्षा असणे रास्तच.पण सर्वच विषय इंग्रजीतूनच शिकावेत याची खरच गरज आहे काय?इंग्रजी चांगलं बोलता आले म्हणजे विद्यार्थी ज्ञानसंपन्न झाला असे म्हणता येईल काय?मगतर इंग्लड मध्ये जन्माला आलेला व इंग्रजी अवगत असणारा शाळेत न जाता ही अव्वल ठरेल. संपर्क भाषा व ज्ञान भाषा यामध्ये खूप तफावत आहे.एखादी भाषा बोलता येणे यात अभासापेक्षाही सवयीचा भाग अधिक आहे.गावाकडे शाळेत शिकलेला पण व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास असणारा विमानतळावर काम करणारा सफाई कामगारही इंग्रजीत उत्तम संभाषण करतो,महाराष्ट्रातून आंध्रप्रदेश मध्ये गेलेले गलाई व्यवसायिक उत्तम तेलगू बोलतात तर आंध्र प्रदेशातून बोअरवेल खुदाई मशीनवर काम करण्यास आलेले कामगार उत्तम मराठी बोलतात,आईस्क्रीमवाले राजस्थानी उत्तम मराठी बोलतात ते कुठल्या शाळेत जाऊन शिकले काय ही भाषा?ते ती भाषा सहवासातुन शिकतात.मग इंग्रजी ही संपर्क भाषा म्हणून अवगत करण्यासाठी सगळे विषय इंग्रजीतून शिकण्याची गरज नाही.उलट इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून उत्तम रीतीने शिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे.अन इतर विषयाचे शिक्षण हे मातृभाषेतूनच घेतले पाहिजे.

शिकण्यासाठी विचार करण्याचं, कल्पनाचित्र रंगवण्याचे स्वातंत्र्य आवश्यक असते.या दोन्ही गोष्टी शिक्षकाने व शाळेने सहजपद्धतीने द्यायला हव्यात.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आव्हानात्मक प्रश्न विचारले पाहिजेत.त्यांना त्यावर विचार करू दिला पाहिजे.मग त्या प्रश्नाची उत्तरे घेऊन यायला लावले पाहिजे.पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तो विद्यार्थी मातृभाषेतूनच शिकेल.इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या घरी सर्वजन मराठी बोलतात.शेजारी मराठी बोलतात.नातेवाईक मराठीतच बोलतात. मित्रासोबत संभाषण मराठीतच होते.तर शाळेत शिकताना तो इंग्रजीत शिकेल मात्र विचार मराठीतून करेल.हे करताना इंग्रजीतून शिकलेल्या बाबीचा मराठीत म्हणजे त्याच्या मातृभाषेत अन्वयार्थ लावेल.त्यावर मराठीत म्हणजे त्याच्या मातृभाषेत विचार करेल.त्यांनतर ते मराठीत विचार केलेले इंग्रजीत सादर करण्याचा प्रयत्न करताना अनेक बाबीचा गोंधळ त्या बालकाचा उडतो अन अध्ययनातील गती व रुची दोन्ही कमी होते.

शाळेत दाखल झाल्यावर सुरवातीला चार इंग्रजी कविता,गुड मॉर्निंग,गुड नाईट मुलगा म्हणाला की आईबाबांच्या आनंदाला पारावार उरत नाही व आपला मुलगा खूप भारी शिकत आहे असा समज ते करून घेतात.पण जस जसा अभ्यासक्रम विस्तारत जाईल तस तसा तो त्या विद्यार्थ्याला उमजत नाही व पालकांना समजत नाही.अनेक सवाल त्याच्या मनात निर्माण होतात पण त्याची उत्तरे सापडत नाहीत कारण सुरवातीपासून समजण्यापेक्षा दाखवण्यावर भर असल्याने पोपटपंची सवय लागते.असे होऊन गेल्या एका वर्षात जवळपास 14 हजार विद्यार्थ्यानी महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमातून मध्येच पुन्हा मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतले आहेत.मध्येच माध्यम बदलल्याने पुन्हा त्या विद्यार्थ्याचा गोंधळ उडतो त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचे माध्यम निवड करताना विचारपूर्वक निवडणे गरजेचे.अन शास्त्रीयदृष्टया ते माध्यम मातृभाषा हेच असावे.

भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन अब्दुल कलाम साहेब शिक्षणातून आयुष्यभर शिकत रहाणारा स्वतंत्र ज्ञानोपासक घडवणे हे ध्येय असावे असे म्हणत.पण प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून न मिळाल्यास असे नवनिर्मितीचा आंनद घेणारे ज्ञानोपासक घडणे कठीणच.इंग्रजी भाषा अथवा इतर भाषा आपल्या व्यक्तिमत्व विकासात भर घालते. पण ती भाषा श्रेष्ठ व आपली कनिष्ठ समजणे कोतेपणाचे ठरेल.इंग्रजी भाषेत महान ग्रंथ संपदा निर्माण झाली,निरनिराळे शोध लागले,औद्योगिक क्रांती झाली याचे श्रेय या भाषेला आहे.पण यातील बहुसंख्य लेखक,कवी किंवा शास्त्रज्ञ यांची मातृभाषा इंग्रजी होती किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे लक्षात घ्यावी लागेल.

जगातील मुख्य विकसित देशांचा विचार केल्यास त्यांच्या देशात त्यांच्या भाषेचाच मुख्यत्वे करून वापर केला जातो.चीन,जपान,फ्रान्स,जर्मनी,रशिया या देशात कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही.या देशात शिक्षणाचे माध्यम हे त्यांची मातृभाषा आहे.इंग्रजी भाषा शिकण्यास केवळ संपर्क भाषा म्हणून प्रोत्साहन दिले जाते.नुकत्याच एका कार्यक्रमात देशाचे उपराष्ट्रपती एम.वेकैय्या नायडू यांनी जन्म देते ती माता,जेथे जन्म लाभतो ती जन्मभूमी,ज्यांचा वारसा लाभतो तो मातृभूमी आणि जीचे मातेच्या गर्भात आपल्या व्यक्तिमत्वाशी नाते जोडले जाते ती मातृभाषा यांचा सन्मान हेच कोणत्याही व्यक्तीचे  सर्वोच्च जीवन मूल्य असायला हवे असे प्रतिपादन केले.याचा विचार करत सरकारने मातृभाषेतुन प्राथमिक शिक्षण घेण्याबाबत व देण्याबाबत समाजात जाणीव जागृतीसाठी कृती कार्यक्रम राबवण्यास प्रयत्न केले पाहिजेत.अनेकदा प्रशासकीय कामकाज,न्यायालयीन कामकाज यामध्येही त्या त्या राज्याची मातृभाषा वापरास प्राधान्य दिले पाहिजे.जेव्हा अध्ययन उद्देशपूर्ण असते,तेव्हा सर्जनशीलता बहरते. सर्जनशीलता बहरते,तेव्हा विचार उत्पन्न होतात.विचार उत्पन्न होतात तेव्हा ज्ञान पूर्णतः प्रकाशित होते.जेव्हा ज्ञान प्रकाशित होते तेव्हा अर्थ व्यवस्थेची भभराट होते.देशाच्या आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक विकासाचा मार्ग मातृभाषेतून शिक्षणातूनच जाणार असल्याने,सुजाण पालक ,शिक्षक व शासन यानी शाळा फक्त शैक्षणिक केंद्र नाही तर ज्ञान व कौशल्य केंद्रे बनली पाहिजेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.फक्त दिखावा व स्टेटस सिंबॉल म्हणून शाळांची माध्यमे न निवडता शास्त्रीय दृष्टया अभ्यास करून मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेताना,इंग्रजी ही जागतिक संपर्क भाषा असल्याने ती आत्मसात करावी यासाठी प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांच्या सर्जनशिलतेस प्रोत्साहन मिळेल.

अमोल शिंदे
(उपक्रमशील प्राथमिक शिक्षक)
9420453475
Email- amol.mallewadi@gmail.com

31 डिसेंबर मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्यासोबत

यंदाचा 31 डिसेंबर स्पेशल झाला.तसे 31 डिसेंबर कधी आम्ही साजरा करत नाही.पूर्वी घरी एकच दूरदर्शन चैनल असायचे अन 31 डिसेंबर दिवशी काही विशेष कार्यक्रम असायचे.आम्ही आवर्जून घरातील सर्वजण एकत्र तो कार्यक्रम पहायचो.तोच आमचा 31 डिसेंबर पण पुढे चैनलच्या गर्दीत तो हरवला.अन सोशल मीडियावर सर्वाना शुभेच्छा संदेश पाठवण्यापर्यंत येऊन तो येऊन थांबला...

पण कालचा 31 डिसेंबर मात्र खऱ्या अर्थाने साजरा झाला तो बदलत्या जीवनशैलीत, हरवलेल्या कुटुंब व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या समस्या,अन त्यातून पुढे जाण्यासाठी स्वतःपासून नव्या वर्षात कशी सुरवात करावी याबद्दल मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाने.मराठा सेवासंघाच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात 2017 ला निरोप व नव्यावर्षाचे स्वागत करताना आदरणीय खेडेकर साहेबांनी छोटी झालेली कुटुंबे,अतिसुरक्षित रहाण्याच्या सवयीने स्वतःच्या क्षमतांचा विसर पडत असलेले पालक व बालक,सुजाण पालकत्व म्हणजे नेमके काय?स्वतःच्या शरीराकडे होणारे दुर्लक्ष अन त्यासाठी नियमित व्यायामाचा संकल्प पूर्णत्वास नेण्याची गरज अत्यन्त सहजपणे उदाहरणांसह साहेबानी सांगितली.

समाजाचे छोटे रूप कुटुंब,अन या कुटुंबात मातेचे स्थान अनन्यसाधारण महत्वाचे.पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेचा त्याग करत,स्त्री पुरुष समतेवर आधारित व्यवस्था स्वतःच्या घरापासून सुरू करण्याचे आवाहन साहेबानी केले.महिलांना बरोबरीचे स्थान हे खऱ्या अर्थाने समाज सक्षम करण्याचे पहिले पाऊल आहे.यावेळी एकतर्फी भाषण न करता उपस्थितांशी अत्यन्त खुला संवाद साहेबानी साधत उपस्थितांना बोलते केले.फक्त मुले इंग्रजी माध्यमात शाळेला घातली म्हणजे जबाबदारी संपली नाही.आईला आगोदर उत्तम इंग्रजी आले पाहिजे.प्रत्येक आईला संगणक हाताळता आला पाहिजे.सध्याच्या काळात आई अपडेट हवी अन त्यासाठी आईने(स्त्रियांनी)स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे.स्वतःची दिनचर्या निश्चित करावी.येणाऱ्या काळात नोकऱ्याच्या मागे धावण्यापेक्षा  कोणताही व्यवसाय करण्याची तयारी युवकांनी ठेवावी,तसेच पालकांनी आपल्या मुलांना व्यवसाय,उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करावे.विवाह करताना बऱ्याच वेळा मुलग्यापेक्षा मुलगी कमी शिकलेली असावी असा कल असतो तो बदलून मुलग्यापेक्षा मुलगी अधिक शिकलेली असावी असा दृष्टिकोनात बदल केला पाहिजे.फक्त इंजिनियर व डॉक्टरच होण्यापेक्षा स्वतःच्या उपजत कलागुणांना/क्षमताना वाव देत मनोरंजन विश्वात व माध्यमामध्ये करिअर करण्याकडे तरुण तरुणींनी लक्ष द्यावे असा संदेश आदरणीय खेडेकर साहेबानी दिला.

खऱ्या अर्थाने सरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे स्वागत एका असामान्य व्यक्तिमत्वासोबत त्यांचे विचार ऐकत झाल्याने आजचा 31 डिसेंबर स्पेशल बनला...

🎉🎊आपणांस व आपल्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक  शुभेच्छा 🎉🎊🌷🌸🌺🌹

          🎉🎉  *नवीन वर्ष 2018 हे आपणांस आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…🎉🎉🌹🌹☘☘🌺🌺

अमोल शिंदे

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची.. 🖋अमोल शिंदे🖋...